दाऊदचा आधार कोसळला

dawood
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर ही काल मरण पावली. तिच्या निधनाचे दाऊदच्या गँगच्या कारवायांवर नेमके काय परिणाम होतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु अशा प्रकारच्या कारवाया करणार्‍या गुंडांच्या साम्राज्यामध्ये घराणेशाहीला महत्व असते आणि कुटुंबातला एखादा माणूस मरण पावला तर ते नुकसान त्यांना जाणवतेच. विशेषत: दाऊद इब्राहिमला तीन भाऊ असून सुद्धा त्यातला कोणताही भाऊ कारभारात नाही. एक बहीण कारभारात होती, ती मरण पावली. याचा परिणाम नक्कीच त्याला जाणवणार आहे. दाऊद इब्राहिम भारतात घातपाती कारवाया करून कराचीत जाऊन लपला आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्याला एका भीतीने ग्रासले आहे. कॉंग्रेसच्या सरकारपेक्षा नरेंद्र मोदींचे सरकार आपल्या साम्राज्याला मोठा धक्का लावू शकेल अशी भीती त्याला वाटते. अशा वातावरणातच मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल करून देणार्‍या मुंबई शहरातला त्याचा हा आधार कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊद इब्राहिमला पकडून आणू अशी प्रतिज्ञा केली आहे. हसीना पारकरच्या मृत्यूमुळे सरकारला दाऊदला पकडणे आता सोपे जाईल असे दिसत आहे.

हसीना पारकर ही दाऊदच्याच काळ्या आर्थिक साम्राज्यावर जगत होती. मुंबईच्या नागपाडा भागात गुंडगिरी आणि बेकायदा बिल्डरांच्या विश्‍वात तिचा मोठा गवगवा होता. हसीना पारकरचा पती इस्माईल याची १९९१ साली अरुण गवळीच्या गँगने हत्या केली होती. तोही गँगस्टरच होता. परंतु पती मेल्यामुळे हसीनाने विचलित न होता आपल्या पतीचा खंडणी वसुलीचा व्यवसाय आपल्या हातात घेऊन पुढे चालवला होता. मुंबईच्या बर्‍याच मोठ्या भागात बेकायदा जागा रिकाम्या करून देणे आणि त्या जागा रिकाम्या करून दिल्या आहेत त्यांच्याकडून खंडण्या वसूल करणे असा तिचा व्यवसाय जारी होता. तिच्यावर खंडणी, अपहरण, धमक्या असे विविध गुन्हे दाखल होते. तिचे वय ५६ वर्षे होते आणि ती दाऊद इब्राहिमशी अजूनही संपर्क साधून होती. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात कराची येथे राहतो. भारताचा तसा दावा आहे, परंतु पाकिस्तान सरकार तो फेटाळत आहे आणि दाऊद इब्राहिम दुबईला जाऊन राहिला असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात दाऊद इब्राहिम दुबई आणि कराची दोन्ही ठिकाणी असतो असे सांगितले जाते. पण तो आपल्या मुंबईतल्या व्यवसायाविषयी हसीना पारकर हिच्याशीच सतत संपर्क ठेवत असे. आता त्याचा मुंबईतला हा आधार कमी झाला आहे.

दाऊद इब्राहिमची एक शोकांतिका अशी आहे की, तो आता परदेशात वास्तव्याला असल्यामुळे मोठा निराश झालेला आहे. काळ्या मार्गाने निर्माण केलेले त्याचे साम्राज्य सुमारे ८० ते ९० हजार कोटी रुपयांचे असावे असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. शस्त्रांची खरेदी, बांधकाम व्यवसाय, दागिन्यांचा व्यवसाय, नशिल्या पदार्थांची तस्करी आणि खंडणी वसुली, त्याचबरोबर हवाला मार्केट आणि आयपीएल क्रिकेटमध्ये होणारी गुंतवणूक अशा अनेक मार्गांनी त्याचे हे साम्राज्य उभेही आहे आणि वाढत चालले आहे. मात्र एवढे साम्राज्य हाती असूनही आपल्या मातृभूमीपासून दूर रहावे लागत असल्यामुळे तो बराच होमसिक झाला आहे असे सांगितले जाते. २०११ साली त्याला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यातला पहिला झटका जोरदार होता आणि दुसरा सौम्य होता. त्याची बहीण काल मरण पावली असली तरी खुद्द दाऊद हा मात्र २०११ पासूनच मृत्यूच्या छायेत वावरत आहे आणि म्हणूनच तो आपले साम्राज्य आपल्यानंतर कोण सांभाळणार या चिंतेत आहे. तूर्तास तरी छोटा शकील हा त्याचा सहकारी त्याच्या वतीने सगळे व्यवहार सांभाळत आहे. किंबहुना दाऊद गँगमध्ये आता छोटा शकील याने दाऊदनंतरचा दुसरा क्रमांक मिळवला आहे.

कदाचित दाऊद इब्राहिम तिसरा झटका येऊन मरण पावलाच किंवा मोदी सरकारने खरोखरच त्याला जेरबंद केले तर त्याच्या सगळ्या आर्थिक साम्राज्याचा डोलारा छोटा शकीलच्या हातात येणार आहे. या संबंधात पूर्वी इक्बाल मिर्ची याचे नाव घेतले जात होते. त्याबरोबरच टायगर मेमन आणि अन्यही काही सहकारी नंबर दोनच्या स्थानासाठी धडपडत होते. त्यातला इक्बाल मिर्ची २०१३ साली लंडनमध्ये मरण पावला. छोटा राजन हाही एक मोठा सहकारी होता. पण १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर तो दाऊदपासून दूर गेला आणि त्याने दाऊदच्या काही सहकार्‍यांना यमसदनाला पाठवले. त्यामुळे छोटा राजन हा दाऊदच्या टोळीतला एक छोटा सहकारी बघता बघता नंबर दोन झाला आहे.
दाऊदला तीन भाऊ आणि एक बहीण आहे. त्यातली एक बहीण आता मरण पावली. त्याचा एक भाऊ इक्बाल कासकर हा मुंबईत राहतो, पण दाऊदचे साम्राज्य सांभाळण्याची कुवत त्याच्यात नाही. दोन भाऊ कराचीत त्याच्यासोबत राहतात. परंतु छोटा शकील याने या दोघांनाही दूर सारून दाऊदचा नजिकचा सहकारी म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले आहे. म्हणजे दाऊद इब्राहिमचे तीन भाऊ दाऊदच्या साम्राज्याचे वारस नाहीत. केवळ त्याची बहीण हीच त्याचा मुंबईतला कारभार काही प्रमाणात पहात होती. आता ती मरण पावल्यामुळे दाऊद इब्राहिम पूर्णपणे छोटा शकीलवर विसंबून आहे. छोटा शकीलने मुंबईमध्ये एक वेगळी यंत्रणा निर्माण केलेली आहे आणि ती आता हसीनाच्या ऐवजी काम पाहील. म्हणजे डी गँगमध्ये दाऊद इब्राहिमची भावंडे कारभारापासून दूर आहेत. छोटा शकीलचे वर्चस्व वाढले आहे. मोदी सरकार छोट्या शकीलचा कट्टर वैरी छोटा राजन याचा वापर करून दाऊद इब्राहिमला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला आलेले हृदयविकाराचे झटके आणि बहिणीचा देहांत यामुळे तो बचावात्मक पवित्र्यात गेला असेल तर त्याच्यावर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळणे सरकारला सोपे जाणार आहे.

Leave a Comment