कट्टर समर्थकांची नारायण राणेंना ‘सोडचिठ्ठी’?

rane
मुंबई – लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला दारूण पराभव शिवाय बालेकिल्ल्यावरही शिवसेनेने कब्जा मिळविल्याने तसेच मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावूनही पदरात काहीच पडत नसल्याने कॉंग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांना कॉंग्रेसमधील अनेक पदाधिकारीच काय कार्यकर्ते ‘सोडचिठ्ठी’ देण्याच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे.

शिवसेना सोडल्यानंतरही सिंधुदुर्गावर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या राणे यांचा राजकीय प्रभाव गेल्या काही वर्षांत ओसरला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुत्र नीलेश यांचा पराभव झाला. या पराभवाचे खापर राणेंचे दुसरे सुपुत्र नीतेश राणे यांनी राजन तेली, संजय पडते, काका कुडाळकर व सतीश सावंत यांच्यावर फोडले. पडते व कुडाळकर यांनी नीतेश यांच्या वक्तव्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. तर तेली यांनी या प्रकरणी नारायण राणे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेट मिळू शकली नाही.परिणामी मुलाच्या आरोपांना राणे यांची मूक संमती असल्याचा या सर्व पदाधिकाऱ्यांचा समज झाला आहे. त्यातूनच त्यांनी राणेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे मुलाचा दारुण पराभव झाल्यामुळे राज्यात व दिल्लीत राजकीय वजन घटलेले नारायण राणे आता स्वत:च्या ‘होमपीच’वर म्हणजेच सिंधुदुर्गातही एकाकी पडल्याचे चित्र आहे. नीलेश राणेंच्या पराभवाचा ठपका नीतेश यांनी राणेंच्या एकेकाळच्या कट्टर समर्थकांवर ठेवल्याने हे नाराज समर्थक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. राणेंवर नाराज असलेल्या सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’ भेटीचे निमंत्रण आल्याचीही चर्चा आहे.

Leave a Comment