आमलाच्या शतकाने द.आफ्रिका विजयी

amla
कोलंबो – दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर हाशिम आमलाने झळकवलेल्या शतकच्या जोरावर आणि रेयान मॅक्लारेनने तीन चेंडूत घेतलेल्या दोन बळीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेवर ७५ धावांनी विजय मिळविला. सामनावीराचा पुरस्कार आमलाला मिळाला.

आमलाने १३० चेंडूंच्या खेळीत ८ चौकार व एक षटकारांसह १०९ धावा करीत तिसऱया गडय़ासाठी कर्णधार अब्राहम डीव्हिलियर्ससमवेत १५१धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे आफ्रिकेला ५० षटकांत ५ बाद ३०४ अशी भक्कम धावसंख्या उभारता आली. डीव्हिलियर्सने ७० चेंडूत ५ चौकार व एक षटकार ठोकला. यजमानातर्फे बहरात असलेल्या कुमार संगकाराने ८४ चेंडूत ८८ धावांचे योगदान दिले तरी त्याला इतरांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने त्यांचा डाव ४०.३ षटकांत २२९ धावांत आटोपला.

लंका संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करीत होता. पण वेगवान गोलंदाज मॅक्लारेनने थिरिमने व संगकारा यांना ३८ व्या षटकात बाद केल्यानंतर लंकेचा डाव गडगडला. त्यांच्या शेवटच्या पाच फलंदाजांनी केवळ १३ धावांची भर घातल्याने ६ बाद २१६ वरून त्यांचा डाव २२९ धावांत कोलमडला. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर इम्रान ताहिर महागडा ठरला तरी त्याने ५० धावांत ३ बळी मिळविले. लंकेच्या डावात कुशल परेराने ३४, दिलशानने ४० धावा केल्या. स्टीनने ३८ धावांत २, मॉर्नी मॉर्कल व मॅक्लारेन यांनी प्रत्येकी २, फिलँडरने एक बळी मिळविला.

त्याआधी लंकेचा स्पिनर अजंथा मेंडिसने ६१ धावांत ३ बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. कॅलिसला त्याने शून्यावरच बाद केले. ५८ धावांच्या सलामीनंतर त्यांनी तीन चेंडूत दोन बळी गमविले. डी कॉक २७ व कॅलिस शून्यावर बाद झाले. पण आमला व डीव्हिलियर्स यांनी डाव सावरताना दीडशतकी भागीदारी करून संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली.

Leave a Comment