… आता पंढरीत प्रवेश !

palkhi1
वाखरी ;
स्वल्प वाटे चला जावू।
वाचे गावू विठ्ठल॥
तुम्ही आम्ही खेळी मेळी।
गदारोळी आनंदे ॥

या अभंगाची अनुभूती आज वाखरीच्या उभ्या आणि गोल रिंगणात वैष्णवांना आली. आनंद व प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी विठू माऊलीच्या ओढीने निघालेला संतांचा विराट मेळा आज पंढरीसमीप वाखरीत विसावला.

भंडीशेगांव मुक्कामी पहाटे माऊलींची विधीवत पूजा करण्यात आली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वाल्हेकरांच्या दिंडीमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. पालखी सोहळ्यात वाल्हेकरांना समाजआरतीचे वेळी पंख्याचा मान असतो. वाल्ह्याचे अभियंते कृष्णाजी भगवंत मांडके यांनी निरा नदीवर स्वखर्चाने पुल बांधून माऊलींचा पालखी सोहळा जेजूरी, वाल्हे मार्गे लोणंदला नेला. त्या सेवेप्रित्यर्थ माऊलींना आरतीवेळेस वारा घालण्याचा मान मांडके यांना देण्यात आला आहे. त्यांच्यावतीने पालखी तळावर कांदेनवमी साजरी केली जाते. दुपारचे भोजन घेवून हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

भंडीशेगांव येथे ओढ्यावर नवीन पूल झाल्याने व पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्याने वाहतूकीत कोठेही अडचण आली नाही. दुपारी 3 वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. चोपदारांनी रस्त्यावरच उभे रिंगण लावून घेतले. दुपारी 3.30 वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. पुढे माऊलीचा अश्‍व तर मागे स्वाराचा अश्‍व धावत होता. पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत, टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा अखंड जयघोष चालू होता. अश्‍वांनी धावत जावून माऊलींना एक प्रदक्षणा पूर्ण करीत रथामागे 20 दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल असा जयघोष वैष्णवांनी केला. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला.
तुकोबारायांचे उभे रिंगण

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 4 वाजता बाजीराव विहीरीजवळ पोहोचला. उभ्या रिंगणासाठी चोपदारांनी अश्‍व सोडले. अश्‍वांनी लाखो वैष्णवांच्या साक्षीने तुकोबारायांना प्रदक्षिणा घालून एक रिंगण पूर्ण केले. तुकाराम, तुकाराम असा जयघोष करीत हा सोहळा वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

माऊलींचे गोल रिंगण – उभ्या रिंगणानंतर माऊलींचे चोपदार राजाभाऊ, रामभाऊ व बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण तयार करण्यात आले. या आखीव रेखीव रिंगणावर गोल रिंगणाला सुरूवात झाली. सुरूवातीला माऊलींचा व स्वाराचा अश्‍व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. त्यानंतर पताकाधारी व माऊलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. सायंकाळी 4.15 वाजता जरी पटक्याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने 2 प्रदक्षणा पूर्ण केल्या. त्यानंतर माऊलींच्या अश्‍वाला चोपदारांनी रिंगण दाखविले. ढगाळ वातावरणात स्वाराच्या अश्‍वासह माऊलीच्या अश्‍वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदिपक दौड करून 3 प्रदक्षणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अश्‍वांवर खारीक, बुक्याची उधळण केली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.

आज पालख्या पंढरीत – उद्या दि.8 रोजी सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी 1 वाजता माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपूरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आदि संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत महाराष्टाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे 3 लाख वारकरी वाखरीत दाखल झाले आहेत.

Leave a Comment