अशी राखली जाते अर्थसंकल्पाची गोपनियता

budgetनवी दिल्ली – भाजप आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात १० तारखेला नवीन सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थंसकल्प कसा तयार होतो आणि त्याची गोपनियता कशी राखली जाते या विषयी सर्वसामान्य नागरिकांत नेहमीच कुतुहल असते.

आपल्याला हे माहिती हवे की अर्थमंत्रालयाचा इकॉनॉमिक अफेअर्स विभाग व त्यातील बजेट विभाग दरवर्षीचा देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे काम ऑगस्ट सप्टेंबरपासूनच सुरू होत असते. अर्थसंकल्प तयार करताना अत्यंत गुप्तता पाळली जाते. यात सहभागी असलेल्या कर्मचार्‍यांवर आणि अधिकार्‍यांवर अनेक बंधने असतात. अर्थसंकल्प अर्थमंत्रालयाच्या बेसमेंटमध्ये प्रिंट केला जातो. काम करणारे सुमारे १०० लोक आठवडाभर आधी तेथेच राहतात. अर्थसंकल्पाची गोपनियता कायम राहावी यासाठी ही काळजी घेतली जाते.

अर्थसंकल्पाचे बाड मंत्रालयातून बेसमेंटमध्ये आणेपर्यंत तसेच संसदेपर्यंत नेताना कडक सुरक्षा असते. जानेवारीपासूनच अर्थसंकल्पासंदर्भातल्या बातम्या बाहेर जाऊ नयेत म्हणून अर्थमंत्रालयापासून मिडीयाला दूर केले जाते. इंटेलिजन्स ब्युरोचे सुरक्षा रक्षक येथे तैनात केले जातात. बेसमेंटमध्ये काम करत असलेल्या संबंधितांचे फोन टॅप केले जातात. या ठिकाणी इनकमिंग सुविधा असलेला एकच फोन असतो आणि हा फोन घेणार्‍या व्यक्तीसोबत इंटेलिजन्सचा एक माणूस सतत हजर असतो. इंटरनेट सेवा येथे दिली जात नाही.

अर्थमंत्रालयात येणार्‍यां जाणार्‍यांवर सीसीटिव्हीची नजर असते. तसेच बेसमेंटमध्ये अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या कर्मचार्‍यांना ऐनवेळी वैद्यकीय मदतीची गरज भासली तर त्यासाठी येथेच वैद्यकीय अधिकार्‍यांची टीमही तैनात केली जाते. इतकेच नव्हे तर या ठिकाणाहून कुणाला बाहेर जाण्याची वेळ आलीच तर त्या व्यक्तीच्या सोबतही दिल्ली पोलिस आणि इंटेलिजन्सचा माणूस दिला जातो. आठवडाभर येथे मुक्कामास असलेल्या या कर्मचार्‍यांना जेवण देतानाही ते विषरहित आहे याची टेस्ट करून मगच दिले जाते असे समजते.

Leave a Comment