९७ लाखापैकी केवळ सव्वा चार लाख युवकांना नोकरी

young
नवी दिल्ली – देशभरातील रोजगार मार्गदर्शन केंद्रांवर २०१२ मध्ये ९७ लाख २२ हजार युवकांनी नोकरीसाठी नोंदणी केली. त्यापैकी अवघ्या चार लाख २८ हजार युवकांनाच नोकरी मिळाल्याचे केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री विष्णू देव साई यांनी लोकसभेत सांगितले.

उपलब्ध आकडेवारीनुसार, रोजगार मार्गदर्शन केंद्रांवर नोंदणी करणा-या युवकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नसल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. यासाठी नोंदणी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि अन्य समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.देशभरात ९५६ रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यरत असून तेथे नोंदणी करणा-या बेरोजगार युवकांच्या संख्येत वाढ झाली आहे.नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, नोकरी शोधण्याचे बरेच मार्ग आहेत आणि अनेक प्रकारे संधी उपलब्ध आहेत. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीला मुकावे लागते.

राज्य सरकारच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि अन्य समुपदेशन सेवा उपलब्ध करुन दिल्यास या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कोठे उपलब्ध आहेत, त्याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकेल, असेही साई यांनी सांगितले.२०११ मध्ये ६२ लाख सहा हजार युवकांनी नोकरीसाठी नोंदणी केली. त्यातील चार लाख ७२ हजार युवकांना नोकरी मिळू शकली.