विमा एजन्सी : उत्तम बिनभांडवली व्यवसाय

insurance
खिशात एक पैसाही नसताना आणि जवळ फार मोठे भांडवल नसताना सुद्धा धंदे करता येतात आणि चांगला पैसा मिळवता येतो. असे सांगण्यामागे मराठी माणसाला स्वावलंबी करण्याचा हेतू आहे. आपल्या समाजात आपल्या आयुष्याचे टाईमटेबल जवळजवळ ठरल्यासारखे असते. यामध्ये आधी शिक्षण झाले की नोकरी मिळवणे हे काम ठरल्यासारखेच असते. एखादा मुलगा शिकून पदवीधर झाला की, त्याचे नातेवाईक, मित्र सगळे त्याला पहिला प्रश्‍न विचारतात, आता कोणती नोकरी करणार? कुठे प्रयत्न करणार? तोेही मुलगा त्या दिशेनेच प्रयत्न करत असतो. मात्र आपल्यापैकी कोणीही त्याला असा प्रश्‍न विचारत नाहीत की, ‘शिक्षण संपले. आता कोणता व्यवसाय करणार?’ शिक्षणाच्या पाठोपाठ नोकरीच असते, पण व्यवसाय नसतो. किंबहुना स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला किंवा मुलाला आपल्या समाजात किंमत सुद्धा दिली जात नाही. लग्नाच्या बाजारात सुद्धा त्याची किंमत शून्य. त्याला कोणी मुलगी देत नाही. स्वत:च्या व्यवसायात लाख रुपये कमवतो, पण अशा मुलांना किंमत नाही. नोकरीत दहा हजार रुपये कमवणारा त्याच्यापेक्षा जास्त मान मिळवतो. म्हणजे स्वत:च्या व्यवसायाचा मालक असण्यापेक्षा दुसर्‍याच्या हाताखाली नोकरी करणार्‍याला आपण मोठे समजतो.

ही मनोवृत्तीच चाकरमानी मनोवृत्ती म्हणवली जाते. स्वत:चा मालक असण्यापेक्षा कोणाचा तरी नोकर असलेले बरे या मनोवृत्तीला काय म्हणावे? परराज्यातून लोक महाराष्ट्रात येतात. स्वत:चा व्यवसाय काढून श्रीमंत होतात आणि मराठी माणसे त्यांच्या दुकानात किंवा कारखान्यात नोकरी करण्यात धन्यता मानतात. म्हणून या मराठी माणसाला हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे की, नोकरीसाठी लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा स्वत:च्या बळावर स्वत:चे उपजीविकेचे साधन निर्माण करा आणि इतरांना नोकर्‍या द्या. असे करण्यात खरी धन्यता आहे. परंतु असे काही सांगायला जावे तर चाकरमानी वृत्तीचे मराठी लोक सांगणार्‍यालाच वेड्यात काढतात. धंद्याला भांडवल लागते, मराठी माणसाला तो जमतच नसतो, त्यासाठी भांडवल खूप लागते असे शंभर बहाणे सांगायला लागतात. पण आपण आपल्या आसपास नजर टाकली आणि विविध धंद्यांकडे नीट पाहिले तर आपल्याला असे लक्षात येईल की, हे सारे बहाणे खोटे आहेत आणि ज्याला काही कर्तबगारी करायचीच नाही त्याच्यासाठी हे बहाणे आहेत. मात्र ज्याच्या अंगात धमक आहे तो मात्र असले कोणतेही बहाणे न सांगता स्वतंत्र व्यवसाय उभा करतो.

वरच्या वाक्यात अंगात धमक असणे असा शब्दप्रयोग केला असला तरी स्वत:चा छोटा मोठा स्वयंरोजगार करायला फार मोठी धमक लागतेच असे काही नाही. उदाहरणार्थ विमा एजंट होणे. विमा एजंट होण्यासाठी एक पैसाही भांडवल लागत नाही. मात्र लोकांना विमा उतरवायचा सल्ला देऊन, विम्याची संकल्पना समजावून सांगून त्यांचा विमा उतरवला की, विम्याच्या हप्त्यापोटी एक ठराविक कमिशन एजंटाला मिळत राहते. विमा उतरवणारा स्वत:च हप्ते भरत राहतो आणि त्याचे कमिशन एजंटाच्या खात्यावर जमा होत राहते. विमा उतरवेपर्यंत विमेदाराला विम्याचे महत्व पटवणे एवढेच काम त्याला करावे लागते. नंतर विमा चालू असेपर्यंत कमिशन मिळत राहते. ते मिळत रहावे यासाठी काहीच करावे लागत नाही. कित्येक विमा एजंटांनी या व्यवसायामध्ये चांगले बस्तान बसवून हजारोच काय पण लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आहे. कित्येक एजंट श्रीमंत झालेले आहेत. या व्यवसायात कोणाची ताबेदारी नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे काम करू शकतो. जितके जास्त काम करू तेवढे जास्त उत्पन्न मिळते. नोकरीमध्ये ही सोय नसते. कमी काम करणार्‍याला तेवढाच पगार असतो आणि जास्त काम करणार्‍यालाही तेवढाच पगार मिळतो. पण स्वतंत्र व्यवसायात तसे नसते.

विमा एजन्सी हा एक व्यवसाय सांगितला, ज्यामध्ये कसलीच गुंतवणूक नाही. पण उत्पन्न मात्र एखाद्या उद्योजकाएवढे मिळू शकते. याचा अर्थ सगळ्यांनी विम्याची एजन्सीच घेतली पाहिजे असे नाही. शेवटी प्रत्येकाने व्यवसाय करताना आपल्या स्वभावाला साजेल असा व्यवसाय निवडला पाहिजे. बोलका स्वभाव आणि विमेदाराला विम्याचे महत्व पटेपर्यंत त्याचा पिच्छा न सोडणे हे ज्याला जमते त्यानेच या व्यवसायात पडावे. मुखदुर्बळ माणसाचे हे काम नव्हे. काही लोकांना लोकांशी बोलणे मोठे कठीण वाटते. मग त्याला एखादी गोष्ट पटवणे तर दूरच. असे लोक चांगला विमा एजंट होऊ शकत नाहीत. विमा एजन्सीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणतीही संकल्पना विकणे हा एक व्यवसाय असतो. मग कल्पना विकण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक व्यवसाय येतात. विशेषत: निरनिराळ्या प्रकारचे सल्ले देणारे लोक हे एक प्रकारे कल्पनाच विकत असतात. इथे विक्री आहे पण कल्पनेची विक्री आहे आणि कोणतीही कल्पना विकण्याचा व्यवसाय करणार्‍याला कल्पना कोठून विकत आणावी लागत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सल्टन्सीज् हा एक बिनभांडवली पण उत्तम व्यवसाय होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

1 thought on “विमा एजन्सी : उत्तम बिनभांडवली व्यवसाय”

  1. Sir…. Thank’s
    अब देखो मेरा कमाल आपके मार्गदर्शन और भगवान कि कृपा से मै अब SBI life insu. Agent बनके अप करीयर बनाउगां सर …. ऊर्जा मिली सर आपकी बाते सुनकर…09922386894

Leave a Comment