मुख्यमंत्रीपद हवे ,पण दोन महिन्यांपुरते नको;पतंगराव कदम

kadam
नाशिक – कॉंग्रेसचे हायकमांड महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या अंतिम निर्णयाप्रत पोहचले असले तरी दोन महिन्याचे मुख्यमंत्री पद आपल्याला कदापि नको ,विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद मिळाल्यास नक्की ते स्वीकारू असे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मदत आणि पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केले.

नाशिक विभागाची मदत व पुनर्वसन आणि टंचाई आढावा बैठक कदम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पक्ष वाढविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढण्याचा विचार राष्ट्रवादीने करायला हरकत नाही. काँग्रेसही स्वबळावर सर्व जागा लढवू शकते, असे सूचक विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. तर कदम यांनी राष्ट्रवादीच्या इशाऱ्यात कोणताही अर्थ नसून जागा वाटपाचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष हेच घेणार असल्याचे नमूद केले.

विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागा न मिळाल्यास राष्ट्रवादी २८८ जागा लढविण्यास तयार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यावर संबंधितांनी आपली भूमिका मांडली.

पाऊस लांबल्याने राज्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याची पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ नियोजन करावे, असे कदम यांनी सांगितले.

टंचाईच्या सर्व उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुष्काळ, टंचाई व गारपीटग्रस्तांना आतापर्यंत १३ हजार ३३३ कोटींची मदत शासनाने केली आहे. रोहयोमार्फत मजुरांना कामे उपलब्ध करून दिली जात असून मजुरीची रक्कम त्यांना १५ दिवसात देण्यात येणार आहे. राज्यात खरीप पिकांची सहा टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून नाशिक विभागात ७.१५ टक्के पेरणी झाली असल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी कदम यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या निम्म्या जागांच्या मागणीवर टोलेबाजी केली.

Leave a Comment