जपानमध्ये मेंढय़ांसाठी ‘पाळणाघर’वजा हॉटेल !

sheep
जपानमध्ये स्वत:च्या मालकची मेंढी असणे फॅशन आणि समृद्धी व ऐषोआरामाचे लक्षण मानले जाते. मुळात मेंढी म्हणजे शांत, सुंदर व कोमल व हवाहवासा प्राणी वाटतो. त्यामुळे सगळ्यांना त्यास गोंजारण्याची, किमान हात लावून पाहण्याची इच्छा होतेच. जपानमध्ये त्यांचे फारच लाड केले जातात. श्रीमंत जपानी आपल्या मेंढय़ांची प्रचंड काळजी घेत असतात, अगदी ते शहराबाहेर असले तरी त्यांना काहीच कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतात. त्यांची सोय होण्यासाठी जपानमध्ये मेंढय़ांसाठी चक्क एक हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सहलीसाठी वा कामानिमित्त बाहेर जावे लागणारे जपानी लोक आपल्या पाळीव मेंढय़ा ठेवतात. जपानच्या युगावारा शहरात सुरू झालेल्या या हॉटेल शिप गेस्ट हाउसचे गेल्याच महिन्यात उद्नघाटन करण्यात आले. फक्त मेंढय़ांसाठी असलेले अशा प्रकारचे हे जगातील एकमेव हॉटेल ठरले आहे. तिथे अन्य कोणत्याही प्राण्याला प्रवेश दिला जात नाही. अगदी नर मेंढय़ाससुद्धा, कारण नर मेंढे प्रचंड धुडगूस घालणारे असतात. या हॉटेलची खासियत म्हणजे तिथे मेंढय़ांना गोठय़ात नाही तर आलिशान खोल्यामध्ये ठेवले जाते. अशा 30 खोल्या तिथे असून प्रत्येक ठिकाणी बिछाना, टीव्हीसह विविध सुविधा पुरविलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे नियमित स्वच्छताही केली जाते. जपानमध्ये मेंढीस भाग्याचा प्राणी मानले जाते. पाश्‍चात्य देशांमध्ये अलीकडच्या काळात कुत्रा व मांजरीची हॉटेल्स लोकप्रिय होत असताना मेंढीसाठीही असे हॉटेल का नको, या विचारातून हे हॉटेल सुरू झाले आहे.

Leave a Comment