अर्जेटिनाला आणखी एक धक्का, उपांत्यफेरीला मुकणार मारिया

maira
बेलो हॉरिझोंटे – विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना अर्जेटिनाचा मध्यरक्षक एंजल डी मारियाही दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे.
मांडीच्या दुखापतीतून मारिया अद्याप सावरला नसल्याने, अर्जेटिनाच्या संघव्यवस्थापनाने तो हॉलंड विरुध्दच्या उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले आहे.

रविवारी मारियाच्या दुखापतीची चाचणी केल्यानंतर अर्जेटिना संघाचे डॉक्टर डॅनियल मार्टीनेझ यांनी मारिया खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे सांगितले. मारियाला बेल्जियम विरुध्दच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दुखापत बळावल्याने पहिल्या सत्रात मैदान सोडावे लागले होते.

संघ व्यवस्थापनाने मारिया खेळणार नसला तरी, अर्जेटिनाचा दुसरा स्ट्रायकर सर्जियो अ‍ॅग्युरो खेळण्यासाठी फीट असल्याचे सांगितले आहे. बाद फेरीतील स्वित्झर्लंड विरुध्दच्या सामन्यात मारियाने मेसीकडून मिळालेल्या शानदार पासवर ११८ व्या मिनिटाला निर्णायक गोल झळकवला होता.

हॉलंड सारख्या बलाढय प्रतिस्पर्ध्या विरुध्दच्या सामन्यात तो मेसीसाठी महत्वाचा सहाय्यक ठरु शकला असता. त्यामुळे मारियाचे न खेळणे अर्जेटिनासाठी एक धक्का आहे. मारिया आणि अ‍ॅग्युरोला दहा दिवसांपूर्वी एकसारखी दुखापत झाली होती. मात्र अ‍ॅग्युरो या दुखापतीतून लवकर सावरला.

Leave a Comment