जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-२)

pik2
खरे म्हणजे हे प्राणी ङ्गार धोकादायक असतात. माणसाला खातात. जंगलात असतात तोपर्यंत ठीक आहे. परंतु काही निमित्ताने ते जंगलाजवळच्या मानवी वस्तीत सुद्धा यायला लागतात आणि तिथे आले की, ते माणसांबरोबरच गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या अशा पाळीव प्राण्यांना सुद्धा धोकादायक ठरतात. असे ते धोकादायक असताना सुद्धा ते जंगलामध्ये असले पाहिजेत, असा सरकारचा अट्टाहास का असतो ? त्यांना मारण्यास कायद्याने बंदी आहे, ती का ? असा प्रश्‍न आपल्याला पडतो. परंतु जीवनचक्राच्या एका अवस्थेमध्ये अशा धोकादायक प्राण्यांची सुद्धा आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना मारण्यास बंदी घातलेली असते.

जंगलामध्ये ससे, हरीण असे वनस्पतीवर जगणारे काही प्राणी असतात. ते झाडांचे शेंडे आणि कोवळे मोड खात असतात. जंगलामध्ये अशा प्राण्यांची संख्या वाढली की, जंगलाची वाढ खुंटायला लागते. ससे, हरीण हे शाकाहारी प्राणी माणसाला त्रासदायक नाहीत, पण माणसांना आवश्यक असलेल्या जंगलांना मात्र ते त्रासदायक असतात. म्हणून अशा शाकाहारी प्राण्यांचा बंदोबस्त होण्याची गरज असते आणि ती गरज पुरी करण्यासाठी जंगलामध्ये वाघ, सिंह असे मांसाहारी प्राणी आवश्यक असतात. वाघ, सिंह, लांडगे हे मांसाहारी प्राणी जंगलामध्ये असले की ते सशांचा आणि हरणांचा ङ्गडशा पाडतात आणि त्यांची संख्या मर्यादित ठेवतात. ती मर्यादित झाली की, जंगलांची वाढ व्हायला लागते. म्हणजे जंगलामध्ये झाडे, शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी यांचे एक चक्र चाललेले असते. झाडेही आवश्यक आहेत, शाकाहारी प्राणीही आवश्यक आहेत आणि मांसाहारी प्राणी सुद्धा आवश्यक आहेत.

शेतामध्ये उंदीर ङ्गार धोकादायक असतो. उंदीर हा आपला कट्टर शत्रू आहे. तो केवळ पिकांचाच नाश करतो असे नाही, तर पिकांची वाढच होऊ देत नाही. अनेक वेळा आपण शेतामध्ये एखाद्या पिकाची दाट पेरणी करतो आणि चार दिवसांनी जाऊन बघतो तर पीक ङ्गार पातळ झालेले असते. कारण पिकांच्या कोवळ्या मोडांच्या मुळ्या उंदरांनी कुरतडून खाल्लेल्या असतात. अशा प्रकारे ससे आणि हरीण जसे जंगलातली झाडे वाढू देत नाहीत, तसे उंदीर शेतातले पीक मुळात वाढण्याच्या आतच कुरतडून टाकतात. त्यामुळे पिकांची प्रचंड हानी होते. उंदीर हा वनस्पतीवर अवलंबून असलेला प्राणी आहे. परंतु उंदरांचा सुद्धा बंदोबस्त करणारे काही प्राणी शेतामध्ये असतात. त्यातला पहिला महत्वाचा प्राणी म्हणजे साप. ज्या शेतात साप जास्त असतील त्या शेतात उंदरांची संख्या मर्यादित झालेली असते. सापानंतर उंदरांचा नंबर दोनचा शत्रू म्हणजे घुबड. घुबड सुद्धा उंदीर खाऊन जगत असते. त्यामुळे घुबडांना मारू नये, असे आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेले आहे.

खरे म्हणजे सापाला सुद्धा मारू नये. कारण सगळेच साप काही विषारी नसतात. आपल्या संस्कृतीमध्ये नागपंचमीला सापाची पूजा केली जाते. त्यामागची भावना हीच असावी. काही गावांमध्ये सापाला मारणे हे पाप आहे, अशी भावना असते आणि त्या गावात कोणीही साप मारत नाही. त्या गावातली पिके चांगली आलेली असतात. हे सामान्य ज्ञानावर आधारलेले पीक संरक्षणाचे शास्त्र आहे. काही शेतांमध्ये उंदरांचा बंदोबस्त करण्याचे काम मांजर सुद्धा करत असते. त्यामुळे शेतात मांजर पाळणे सुद्धा ङ्गायद्याचे असते. उंदीर, साप, घुबड हे सारे प्राणी सृष्टीतल्या चक्राचा एक भाग आहेत. आपल्या नकळत त्यांचे त्यांचे जीवनक्रम चाललेले असतात आणि त्यातून शेतामध्ये पिके येत असतात आणि जात असतात. यातूनच शास्त्रज्ञांनी बायोपेस्टीसाईडस् म्हणजेच जैविक कीटकनाशके असे शास्त्र तयार केलेले आहे आणि त्यातून शेतातल्या पिकांना त्रासदायक ठरणार्‍या मावा, तुडतुडे, खोडकीडा, ङ्गळ पोखरणारी अळी या सामान्य कीटकांचा बंदोबस्त करण्याची नैसर्गिक साधने विकसित केली आहेत. ही साधने म्हणजे काही जंतूच आहेत.

आपल्या शेतातल्या या त्रासदायक कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण औषधे ङ्गवारतो. परंतु या कीटकांना खाऊन जगणारे काही मासांहरी कीटक या सृष्टीमध्ये असतात. तेव्हा अशा कीटकांचा वापर करण्याचे तंत्र बायोपेस्टीसाईडस्च्या या शास्त्रामध्ये विकसित केलेले असते. आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हाच आपल्याला उपकारक ठरणारे हे कीटक काम करतील आणि आपल्यासाठीच त्या मावा, तुडतुड्यांचा बंदोबस्त करतील असे काही सांगता येत नाही. कारण ते आपल्या पोटासाठी आपल्या मर्जीने कार्यरत राहात असतात.

योपेस्टीसाईडच्या शास्त्रामध्ये मात्र हे कीटक आणि प्राणी शेतकर्‍यांच्या सोयीने कार्यरत कसे राहतील याचा विचार केलेला असतो. म्हणजे निसर्गत: कार्यरत राहणारे, शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारे हे कीटक जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक माणसाच्या सोयीने कसे कार्यरत होतील हे बघण्याचे शास्त्र म्हणजेच बायोपेस्टीसाईडस्चे शास्त्र आहे. काही वेळा आपल्या शेतातल्या पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव होतो आणि माव्याचा बंदोबस्त शेतातलेच काही कीटक करत असतात. परंतु माव्याचा प्रादुर्भाव एवढा मोठा असतो की, त्यांचा बंदोबस्त करणारे कीटक म्हणाव्या तेवढ्या संख्येने उपलब्ध नसतात. तेव्हा आपल्याला उपकारक ठरणारे हे कीटक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयोगशाळेमध्ये काही विशिष्ट शास्त्रीय प्रयोग करून त्यांची पैदास वाढवली जाते आणि मग ते मोठ्या संख्येने उपलब्ध होऊन माव्याचा बंदोबस्त करतात. अशा शास्त्रामध्ये या पैदास वाढवलेल्या कीटकांची अंडी प्रयोगशाळेत जतन करून ठेवलेली असतात आणि ती पाहिजे त्या पॅकिंगमध्ये शेतकर्‍यांना पाहिजे असलेल्या वेळी देता येतात. चार वर्षाखाली महाराष्ट्रामध्ये उसाच्या पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव ङ्गार झाला होता. त्यामुळे कितीही औषधे मारले तरीही त्यांचा काही उपयोग होत नव्हता आणि हजारो एकर ऊस नष्ट झाला होता. तेव्हा कानोबात्रा किंवा क्रायसोपर्ला यासारख्या कीटकांचा त्यासाठी वापर करण्यात आला. या कीटकांची पैदास वाढविण्यात आली. हे कीटक उसात सोडून दिले की, ते माव्याची अंडी खाऊन टाकतात आणि औषधांचा वापर न करता माव्याचा आपोआप बंदोबस्त होतो.

Leave a Comment