ओढाताण कशासाठी?

congress
महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना या दोन आघाड्यांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच जागा वाटपावरून ओढाताण सुरू झाली आहे. त्यासाठी परस्परांवर दबाव आणला आहे आणि दबाव न मानल्यास सर्वच्या सर्व जागा लढवू असे इशारे द्यायला सुरुवात केली आहे. हे सगळे पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सगळ्यांची एकदा स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हटले आहे. ही शक्यता नाही कारण या चारही पक्षांची स्वबळावर लढण्याची ताकद नाहीच. या दोन आघाड्या अशाच कायम राहणार आहेत, पण आत्ताचा त्यांचा संघर्ष आणि परस्परांवर दबाव आणण्याचे प्रयत्न हे आघाडीतला प्रभावी पक्ष होण्यासाठी आहे. पण गंमत म्हणून या चौघांनीही स्वबळावर निवडणूक लढवलीच तर त्यातून फार गमतीशीर समीकरणे साकार होतील. कोण कोणाचे पाय ओढत आहे आणि कोण कोणाला पाडण्यासाठी कोणाशी गुपचूप हातमिळवणी करत आहे याचा कोणालाच पत्ता लागणार नाही इतका गोंधळ या निवडणुकीत होईल; जर ही निवडणूक चाररंगी झाली तर. कारण या चार पक्षांतून दोन आघाड्या साकार झाल्या असल्या तरी प्रत्येक पक्षात अन्य दुसर्‍या पक्षांचे चाहते मोठ्या संख्येने असतात. म्हणजे भाजपात शिवसेनावादी गट असतो तर दुसरा पवारवादी असतो. अशा गटांमुळे प्रचंड गोंधळ माजेल.

तूर्तास तरी या दोन्ही आघाड्यातील घटक पक्ष जागा वाटपाच्या रस्सीखेचीमध्ये मग्न आहेत. या रस्सीखेचीचा खेळ मोठा गमतीशीर असतो. यातल्या कोणत्याही पक्षाला आपल्या मित्र पक्षाकडून जास्त जागा हव्या असतात. राज्यातल्या २८८ पैकी किती जागा आपल्याला मिळाव्यात आणि किती जागा आपल्या मित्र पक्षाला मिळाव्यात यावरून चढाओढ चाललेली असते. या चढाओढीत कोणताही पक्ष आपल्या वाटेला जास्त जागा याव्यात आणि आपल्या मित्र पक्षाला कमी जागा मिळाव्यात यासाठी सारे बुद्धी, कौशल्य पणाला लावत असतो. युती तर करायची, ती दोघांच्याही फायद्याची आहे असे तर म्हणायचे, परंतु हळूच आपल्या मित्र पक्षाच्या जोरावर आपल्याला जास्त जागा आणि मित्र पक्षाला कमी जागा मिळाव्यात यासाठी डावपेच आखायचे असा हा सारा खटाटोप असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला १४४ जागा हव्या आहेत. म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या मित्राशी फिफ्टी फिफ्टी पार्टनरशीप मागत आहे. अशा प्रकारची भागीदारी कॉंग्रेसला फार महागाची नाही, पण तरी सुद्धा कॉंग्रेस पक्षाचे नेते कां कूं करायला लागले आहेत. कॉंग्रेसची परिस्थिती फार वाईट आहे, त्यामुळे निम्मी भागीदारी करून निवडणुका लढवणे तिच्यासाठीच श्रेयस्कर आहे.

अजित पवार यांनी १४४ जागा द्या, नाहीतर २८८ जागा लढवू असा इशारा दिला आहे. या १४४ जागा मागण्यामागे काय हिशोब आहे हे काही कळत नाही. किंबहुना कसलाच हिशोब नाही. या १४४ जागा कोणत्या, तिथे त्यांचे उमेदवार कोणते आणि त्यांची निवडून येण्याची क्षमता किती हे प्रत्यक्षात दाखवावे लागणार आहे. तशी राष्ट्रवादीची तयारी नाही. केवळ कॉंग्रेसवर दबाव आणणे एवढ्याच एका हेतूने राष्ट्रवादीचे नेते १४४ जागांची मागणी करत आहेत. ते २८८ जागा लढवण्याच्या धमक्या देत असले तरी त्यांच्यात ती धमक नाही. जिथे १४४ उमेदवार देण्याची मारामार तिथे २८८ उमेदवार कोठून आणणार? भाजपा आणि शिवसेना यांच्यातली ओढाताण सुद्धा थोड्याबहुत फरकाने अशीच आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांची युती आहे आणि तिला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु ही शक्यता मोदी लाटेमुळे निर्माण झालेली आहे आणि मोदी हे भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाला जास्त जागा हव्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाट्याला जास्त जागा येणार, त्यांचे जास्त आमदार निवडून येणार, ते मोदी लाटेवर निवडून येणार आणि भारतीय जनता पार्टी कमी जागा निवडून येऊन शिवसेनेचा दुय्यम पक्ष म्हणून काम करणार ही स्थिती भाजपाला सहन होणारी नाही.

त्यामुळे भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. शिवसेनेचा लहान भाऊ होऊन राहण्यापेक्षा उघडपणे युती मोडून स्वत:च्या बळावर निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यात संघर्ष निर्माण झाला आहे, परंतु या संघर्षातून कोणतीही आघाडी मोडण्याची शक्यता नाही. या उपरही अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे चारही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर काय होईल? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते भलतेच जोमात आहेत. १९९९ साली त्यांनी स्वबळावरच निवडणूक लढवली होती आणि ६८ जागा जिंकल्या होत्या. आताही आपल्याला चांगले यश मिळेल असा विश्‍वास त्यांना वाटतो. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून कॉंग्रेसशी दोन हात करणारा पक्ष म्हणून समोर आलेला होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची ती प्रतिमा राहिलेली नाही. दुसर्‍या बाजूला भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये शिवसेना कायम मोठा भाऊ म्हणून वावरत आलेला आहे. आता भाजपाचा आत्मविश्‍वास वाढला असला तरी स्वबळावर निवडणूक लढवून फार जागा मिळविण्याची ताकद भाजपात नाही. तरी शिवसेनेवर दबाव आणून जास्त जागा मिळवून भाजपाने त्या लढवल्याच तर युतीतला मोठा भाऊ हे स्थान फार तर भाजपाला मिळू शकते.

Leave a Comment