ट्रान्सफॉर्मर तारा चोरींमुळे बारामतीवर वीज संकट

electricity
बारामती – पश्चिम महाराष्ट्रातील बारामती भागात गेल्या कांही महिन्यांपासन शेकडो ट्रान्स्फॉर्मर खराब झाले आहेत. यामागचे कारण आहे चोर्‍या. या भागातील ट्रान्स्फॉर्मर मधून चोर तांब्याच्या तारा चोरून नेत असल्याने हे ट्रान्स्फॉर्मर उपयोगाचे राहिलेले नसल्याचे समजते.

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे या शेतीप्रधान भागातील शेतकरी चिंतेत असतानाच आता ट्रान्स्फॉर्मर बंद असल्याने वीजसंकटाची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. वीज मंडळातील जनसंपर्क अधिकारी नागनाथ इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील सुमारे ४५० ट्रान्स्फॉर्मर चोरट्यांची तारा चोरून नेल्यामुळे बंद पडले आहेत.

या ट्रान्स्फॉर्मर मध्ये तांब्याच्या तारा असतात. एका ट्रान्स्फॉर्मरमधील या तारांची बाजारातील किंमत ३० हजार रूपये आहे. त्यामुळे चोरटे या तारांवर डल्ला मारतात. तारा काढल्यामुळे ट्रान्स्फॉर्मर बंद पडतात व वीजवहन अशक्य बनते. महाराष्ट्रात गेल्या ९ महिन्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर तारा चोर्‍या झाल्या असून सुमारे १३ कोटी ५० लाख रूपयांचे वीजमंडळाचे नुकसान झाले आहे. इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर, पुरंदर आणि भोर अशा सहा तहसीलात या चोर्‍या सर्वाधिक प्रमाणात झाल्या आहेत.

एकट्या शिरूर मध्येच २०० पैकी १५० ट्रान्स्फॉर्मरमधील तांबे तारा चोरीस गेल्या आहेत. पोलिसांत वारंवार तक्रार करूनही कांही तपास लागू शकलेला नाही. हा सर्व भाग उस आणि नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र पाऊस नाही आणि वीजही नाही यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

Leave a Comment