भारताच्या मंगळयानाने पार केले ५१० दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर

mars
बंगळूरु – नोव्हेंबर २०१३ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळावर पाठवलेल्या मंगळयानाने आतापर्यंत ७५ टक्के प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला असून ५१० दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर पार केले असल्याची माहिती बंगळूरुमधील इस्त्रोच्या प्रमुख विभागाने दिली. येत्या २४ सप्टेंबरपर्यंत ते आपले लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.
भारतीय अंतराळ संशोधनातील ऐतिहासिक टप्पा मानल्या जाणा-या या यानाने ५१० दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर पार करताना ३०० दिवसांच्या या प्रवासात यानाने तीन चतुर्थांश इतका प्रवास पूर्ण केला आहे. सर्व यंत्रणा उत्तम कार्यरत असल्याचे इस्त्रोने मार्स ऑरबिटर मिशनच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पाच नोव्हेंबर २०१३ मध्ये इस्त्रोकडून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. भारताची ही मोहीम जर यशस्वी झाली तर अशा प्रकारे मंगळाकडे मोहीम पाठवणारा चौथा आणि आशियातील पहिला देश अशी भारताची नोंद केली जाईल. या संपूर्ण मोहिमेसाठी ४५० कोटी रुपये खर्च आला आहे.

Leave a Comment