सानिया मिर्झा उपउपांत्यपूर्व फेरीत !

sania
लंडन – विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि होरिया टेकाउ या जोडीने सहज विजय मिळवत प्रवेश केला आहे.

तर दुसरीकडे आव्हानात्मक सामन्यात पराभूत झाल्याने रोहन बोपन्ना आपल्या जोडीदारासोबत दुसर्‍या फेरीतील स्पर्धेतून बाद झाला आहे.

माटे पाविच-बोजाना जोवानोवस्की या जोडीला सानिया आणि तिचा जोडीदार होरिया यांनी मिळून ६-३, ६-३ ने मात दिली. सहावी मानांकित जोडी सुरुवातीच्या सेटमध्ये ४-३ ने आघाडीवर होती. तेव्हा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर, सानिया-होरिया यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यास क्षणाचा विलंब केला नाही.

सानिया-होरिया या जोडीने संपूर्ण सामन्यात दबाव वाढविला होता. त्यांनी एकूण ५८ गुण जमविले. तर, प्रतिस्पर्धी जोडीला केवळ ३५ गुणांवरच समाधान मानावे लागले. आता या भारत-रोमानिया जोडीचा पुढील सामना १० व्या मानांकीत जॅमी मुर्रे आणि कॅसे डेलाकुआ या जोडीसोबत होणार आहे.

मिश्र दुहेरीच्या दुसर्‍या फेरीतील एका अन्य सामन्यात सातव्या मानांकीत बोपन्ना आणि त्याचा चेक प्रजासत्ताकची जोडीदार आंद्रिया हलावाकोव्हा सुरुवातीच्या सेटमध्ये पराभूत झाले. त्यांना रशियाच्या मिखेल एल्गीन आणि ऑस्ट्रेलियाच्या अनास्तासिया रोदिनेवा यांनी ६-३, ५-७, ३-६ ने मात दिली. बोपन्ना-हलावाकेवाने ११ वेळा चुका केल्या तर, रशिया-ऑस्ट्रेलियाच्या जोडीने ६ वेळा चुका केल्या.

बोपन्नाचे विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. कारण, याआधी त्याला आपला पाकिस्तानचा जोडीदार ऐसाम उल हक कुरैशीसोबत पुरुष दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Leave a Comment