शिवसेनाही नडणार, सर्व जागा लढणार!

uddhav
मुंबई – भाजप पदाधिकाऱ्यांच्या महायुती तोडो भूमिकेनंतर आता शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा नडत लढण्याची तयारी ठेवा, असे आदेश पक्षाच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे सेना-भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटयावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी महायुती तोडून ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली होती. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले असून, भाजपच्या वेगळया भूमिकेचे स्वागत केले आहे. सेना-भाजपची युती राज्यात गेल्या 25 वर्षांपासून आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, भाजपची विधानसभेसाठी कमीत कमी १४४ जागांची मागणी आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. यामुळे युतीत टोकाचा तणाव जाणवत असून, युतीला ग्रहण लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.