लक्ष लक्ष नयनांनी पाहिला रिंगण सोहळा !

palkhi1
माळशिरस – या सुखा कारणे देव वेडावला । वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ॥
शाश्‍वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल असा गोल रिंगणाचा अनुपम्य सोहळा सदाशिवनगर येथे पार पडला. आज लाखो वैष्णवांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवित नवचैतन्य भक्तीचा आनंद सोहळा उपभोगला. सायंकाळी ढगाळ वातावरणात हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. उद्या दि.5 रोजी तो वेळापूरकडे मार्गस्थ होईल.

नातेपुते येथे पहाटे सोहळा प्रमुख डॉ.शिवाजीराव मोहिते यांच्या हस्ते माऊलींची नैमित्तीक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी 6.30 वाजता माऊलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. सुमारे एक ते दीड लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावित श्री ज्ञानराज माऊलींच्या पालखी सोहळ्याने पालखी सोहळ्यातील पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी सदाशिवनगरकडे कूच केली. दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी हा सोहळा सकाळी नऊ वाजता मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माऊलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्‍यांनी भोजन घेतले. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे वारकर्‍यांमध्ये आज चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. सदाशिवनगरच्या रिंगण सोहळ्याची सर्वांना ओढ लागून राहिली होती. मांडवे ओढा येथे पालखी खांद्यावर घेण्यात आली. ती ओढ्याच्या दुसर्‍या काठावर आणण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवून दुपारी 12 वाजता सोहळा सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाला. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवल्याने आज पालखी सोहळ्याला नातेपुते ते माळशिरस या वाटचालीत कोठेच अडचण आली नाही. त्यामुळे दुपारी बरोबर 1 वाजता सोहळा सदाशिवनगरच्या मैदानावर रिंगण सोहळ्यासाठी पोहोचला.

मांडवे ओढ्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा उजव्या बाजूला तर वाहतूक डाव्या बाजूला घेण्यात आली. चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीत कोठेही यावर्षी अडचण आली नाही. रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचे अश्‍व सदाशिवनगर हद्दीत पोहोचले. त्यावेळी सरंपच रेखाताई सालगुडे-पाटील व ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. पाठोपाठ माऊलींचा रथ पोहोचला. भाविकांनी यावेळी दर्शनासाठी एकच गर्दी केली.

आखीव रेखीव रिंगण – सदाशिवनगर येथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले होते. रिंगणाचा तळ सुसा केला होता. भोसरीच्या श्री स्वामी समर्थ आर्टिस्ट राजश्री जुन्नरकर हिने रिंगणाच्या मध्यभागी व गोलाकार नेत्रदिपक रांगोळी काढली होती तर अश्‍वांच्या रिंगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. सुरूवातीला रथापुढील 1 ते 27 दिंड्या अश्‍वासह रिंगणात आल्या. त्यापाठोपाठ माऊलींची पालखी खांद्यावर घेवून रिंगणात आणण्यात आली. रथापाठीमागील सुमारे 20 दिंड्या रिंगणसोहळ्यासाठी आत आणण्यात आल्या. चोपदारांनी पताकाधारी वारकर्‍यांना रिंगणाच्या मध्यभागी घेतले. त्यानंतर रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींची पालखी रिंगणाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या शामियानात आणण्यात आली. माऊलींच्या पादुकांची व अश्‍वांची विधीवत पूजा सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सौ.पद्मजादेवी मोहिते-पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

नेत्रदिपक रिंगण सोहळा – सदाशिवनगर येथील हा नेत्रदिपक रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. अश्‍वांची पूजा झाल्यानंतर जरीपटययाच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर चोपदारांनी अश्‍वांना रिंगण दाखविले. त्यानंतर स्वाराचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ माऊलींचा अश्‍व धावला आणि लाखो भाविकांनी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा एकच जयघोष सुरू केला आणि या जयजयकारातच दोन्ही अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करीत हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.

उडीचा नेत्रदिपक सोहळा – रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. सर्व वारकरी श्‍वास रोखून या नादब्रह्मात तीन होऊन गेले होते. एकात्म भक्तीभावाचा हा शाश्‍वत सुखाचा सोहळा लाखो भाविकांनी अनुभवला.

Leave a Comment