भारत-पाक क्रिकेटसाठी सखोल विचार करण्याची गरज – सोनोवाल

india
नवी दिल्ली – क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी खेळ आणि राजकारण याची सांगड घालणे योग्य होणार नाही, तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सामने सुरू करण्याबाबत सखोल विचार करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. पीसीबीसोबत बीसीसीआयने २०१५-२०२३ असे सहा द्विपक्षीय मालिका सामने खेळण्यासाठी करार केला आहे. २०१२मध्ये पाकिस्तानने अखेर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. मात्र, २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेट बंद झाले आहे.

क्रीडामंत्री सोनोवाल म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढीलवर्षी क्रिकेट सामने होणे शक्य आहे का? यावर चर्चा केली जाईल. खेळामध्ये राजकारण येता कामा नये. खेळातून इतर देशांशी संबंध सुधारू शकतात.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सार्क देशांसोबत संबंध सुधारण्याची सुरुवात केली आहे. खेळातून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी चर्चा करून हा निर्णय घेता येईल. २०१९ मध्ये आशियाई खेळांचे यजमानपद भारत घेणार का? यावर बोलताना ते म्हणाले की,आयओएने यासाठी विस्तृत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. ते अद्याप प्राप्त झालेले नाही. १-२ दिवसात याबाबतचा निर्णय घेता येईल, असेही ते म्हणाले.

खेळांमध्ये भ्रष्टाचार, विवाद आणि अनियमितता नसावी अशी देशवासियांची इच्छा आहे. यूपीए सरकारच्या काळातील क्रीडाविधेयकाबाबत बोलताना ते म्हणाले की, यासाठी आम्हाला पुन्हा नव्याने सर्व संबंधित पक्षांसोबत चर्चा करावी लागेल याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, आर्चेरी सारख्या खेळांचे प्रबळ दावेदार असणार्‍यांसाठी नविन योजना लवकरच हाती घेतली जाईल, यामध्ये केवळ खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक आणि ट्रेनर यांनाही प्रशिक्षण दिले जाईल.

खेळ संस्कृतीचा विकास व्हावा आणि देशाला त्याचा गौरव मिळावा यासाठी शिक्षण क्रमात खेळांना जोडण्याची गरज आहे, यातून राष्ट्र निर्माण होईल आणि भारतीय खेळाडूंची प्रतिभा जगात पोहोचल्याने देश महाशक्ती म्हणून पुढे येईल.

Leave a Comment