भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदार सिंगकडे

sardar-sing
नवी दिल्ली – २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने १६ जणांचा भारतीय हॉकी संघ घोषित केला असून नेतृत्वाची धुरा सरदार सिंगकडे सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघातील जुन्या खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय पुरुष संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी गोलरक्षक हरज्योत सिंग, एस. के. उत्थप्पा, जसजित सिंग आणि मनदीप सिंग यांना वगळण्यात आले असून दानिश मुजतबा व गुरुविंदरसिंग चांदी या दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. सरदारसिंग कर्णधार तर श्रीजेश उपकर्णधार राहील. हॉकी इंडियाचे निवड सदस्य बी. पी. गोविंदा, हरबिंदर सिंग, आर. पी. सिंग आणि अर्जुन हालप्पा यांच्या उपस्थितीत भारतीय संघ निवडण्यात आला. या बैठकीला प्रमुख प्रशिक्षक टेरी वॉल्श आणि ओल्टमन्स उपस्थित होते. २०१० साली नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8-0 असा दणदणीत पराभव करून जेतेपद मिळविले होते.

२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलामीचा सामना २५ जुलैला वेल्स संघाविरुद्ध होईल. त्यानंतर २६ जुलैला स्कॉटलंड विरुद्ध, २९ जुलैला ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर ३१ जुलैला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचे सामने होतील.

भारतीय संघ- पी. आर. श्रीजेश (गोलरक्षक आणि उपकर्णधार), बचावफळी-गुरबाज सिंग, वीरेंद्र लाक्रा, रुपिंदरपाल सिंग, कोटाजित सिंग, व्ही. आर.
रघुनाथ, मध्यफळी-धरमवीर सिंग, सरदार सिंग (कर्णधार), दानिश मुजतबा, चिंगलेसेना सिंग, मनप्रित सिंग, आघाडीफळी-रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गुरुविंदरसिंग चांदी आणि निकीन थिमय्या.

Leave a Comment