ढीग आणि नॅडेप खत पद्धती

ndep
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डाच खोदला पाहिजे असे काही नाही. खड्डा न खोदता सुद्धा कंपोस्ट खत तयार करता येते. त्यासाठी ढीग पद्धतीचा वापर करता येतो. आपण कंपोस्ट खत खड्ड्यात तयार करताना ज्या सार्‍या क्रिया प्रक्रिया वापरल्या त्या सगळ्या वापरून खड्ड्याच्या ऐवजी ढीग लावून खत तयार करावा. उघड्यावर खत तयार केल्यामुळे खतासाठी वापरला जाणारा काडी-कचरा वेडावाकडा पसरण्याची शक्यता असते. त्या संबंधात थोडी काळजी घेतली की, ढीग पद्धतीनेही खत चांगला तयार होऊ शकतो. या पद्धतीत खत तयार करताना सगळ्याच गोष्टी खड्ड्यातल्या खतासारख्याच करावयाच्या आहेत हे लक्षात ठेवावे. २०० लिटर पाणी, त्यात रासायनिक खताचे द्रावण आणि दुसरा असाच डिकंपोझिंग कल्चर, शेण आणि गूळ यांचे मिश्रण असलेला ड्रम असे दोन ड्रम आणि सेंद्रीय कचरा खड्ड्यातल्या खतासारखाच वापरायचा आहे. कंपोस्ट खत तयार करण्याची दुसरी पद्धत आहे नॅडेप खत पद्धती. विदर्भामध्ये काही ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीत तसा जमिनीच्या वरच खत तयार केला जातो. परंतु त्यासाठी हौद बांधला जातो आणि या हौदामध्ये सेंद्रीय कचर्‍याचे स्तर, त्यावरचे द्रावणांचे लेप सारे काही खड्ड्यातल्याच खतासारखे केले जाते. ङ्गरक एवढाच की, मागे सांगितलेल्या पद्धतीत खड्डा आणि नॅडेप पद्धतीत हौद आहे.

या पद्धतीसाठी हौद बांधताना हौदाच्या भिंती विटांनी पूर्ण बंद केलेल्या नसतात. तर अधून मधून त्या भिंतीमध्ये काही विटा न बसविता छिद्रे ठेवलेली असतात. या छिद्रांमधून हवा खेळते आणि ती कचर्‍याच्या विघटनाला उपयोगी पडते. हे विघटन होत असताना ६० ते ७० डिग्री सेल्सियस एवढे तापमान तयार होत असते. परंतु नॅडेप खत पद्धतीमध्ये हवा खेळत राहिल्याने हे उष्णतामान कमी होण्यास मदत होते. कंपोस्ट खत हा जीवाणूंपासून तयार केलेला सेंद्रीय कचर्‍याचा खत आहे. त्यामुळे तो खत शेतात टाकला की, शेताच्या जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढायला मदत होते. रासायनिक खत वापरणार्‍यांच्या शेतीमध्ये जीवाणू शिल्लक रहात नाहीत. त्यामुळे जमीन निर्जीव होत असते. जमिनीमध्ये जेवढ्या जीवाणूंची संख्या जास्त तेवढी जमीन अधिक सुपीक असते आणि तिच्यात अधिक धान्य उत्पादन व्हावे यासाठी बाहेरून खते वापरण्याची गरज नसते. सेंद्रीय शेतीमध्ये या जीवाणूंनाच जास्त महत्व आहे. जीवाणू मातीत जेवढे जास्त तेवढी मातीची ओल टिकवून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. म्हणून अशा पद्धतीनेच कंपोस्ट खत तयार केले पाहिजे.

गावामध्ये प्रत्येकाकडे शेती असतेच असे नाही. मात्र प्रत्येकाच्या घरासमोर उकिरडा असतोच. अशा लोकांच्या घरासमोरचा उकिरडा काही श्रीमंत शेतकरी विकत घेतात आणि तो कचरा आपल्या शेतात आणून तसाच टाकतात. त्यातून जमिनीला खत मिळतो, अशी त्यांची कल्पना असते. मात्र त्यांनी याबाबत सावध राहिले पाहिजे आणि हा कचरा खत म्हणून वापरता कामा नये. आपण कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत पाहिलेली आहे. त्या पद्धतीमध्ये सेंद्रीय कचरा हा कच्चा माल म्हणून वापरलेला आहे. तेव्हा बड्या शेतकर्‍यांनी गावातला विकत घेतलेला हा तथाकथित खत किंवा उकिरड्यातला कचरा खत म्हणून न वापरता कंपोस्ट खतासाठीचा सेंद्रीय कचरा म्हणून वापरला पाहिजे आणि त्यापासून कंपोस्ट खत तयार केला पाहिजे. कंपोस्ट खताचा वापर जपानी शेतकरी प्रभावीपणे करत असतात. या शेतकर्‍यांनी या खताच्या साह्याने धान्यांच्या आणि भाज्यांच्या उत्पादनामध्ये अनेक विक्रम केलेले आहेत. असे विक्रम होऊ शकतात हे माहीत असल्यामुळे जपानी शेतकरी आपल्या गावातला आणि नजिकच्या शहरातला कचरा तसेच हॉटेलात उरलेले खरखटे स्वत: गोळा करत असतो. या कचर्‍यातून उत्तम कंपोस्ट खत तयार करून या शेतकर्‍यांनी जपानसारख्या महाराष्ट्राएवढ्या छोट्या देशाला आज जगातली क्रमांक दोनची आर्थिक शक्ती बनवले आहे. कंपोस्ट खताचा महिमा ङ्गार मोठा आहे.

Leave a Comment