आयएसआयएस ताब्यातील ४६ परिचारिकांची सुटका

iraq
बगदाद – अपहरण केलेल्या ४६ भारतीय परिचारिकांची आयएसआयएसने सुटका केली असून, या परिचारिका लवकरच विशेष विमानाने भारतात परतणार असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी दिली.

इरबिल विमानतळावर या परिचारिकांना नेण्यात आले आहे. इरबिल शहर हे कुर्दीस्तानची राजधानी आहे. आयएसआयएसचे दहशतवादी या परिचारिकांना तिक्रीतमधील इस्पितळातून जबरदस्तीने बाहेर काढल्यानंतर गुरुवारी रात्री मोसुलमध्ये घेऊन गेले होते.

चंडी यांनी सर्व परिचारिका सुरक्षित भारतात परततील असा विश्वास व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट त्यांनी घेतली होती.

आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात उत्तर इराकमधील तिक्रीत शहर आहे. गुरुवारी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी जबरदस्तीने या परिचारिकांना तळघराच्या बाहेर काढले व आपल्यासोबत मोसुल येथे घेऊन गेले.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास या परिचारिका मोसुलमध्ये पोहोचल्या. या परिचारिकांना दोन खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. बंदोबस्ताला असलेले दहशतवादी या परिचारिकांना वेळच्यावेळी अन्न-पाणी देत होते असे सूत्रांनी सांगितले. उत्तर इराकमध्ये इराकी फौजा आणि आयएसआयएसच्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे.

तिक्रीत आणि मोसुल ही शहरे दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. तिक्रीतमधील इस्पितळात नोकरी करणा-या या परिचारिकांनी गेल्या काही दिवसांपासून बाहेर सुरु असलेल्या संघर्षामुळे तळघरात आसरा घेतला होता. मात्र गुरुवारी दहशतवादी या तळघरापर्यंत पोहोचले व त्यांनी सक्तीने या परिचारिकांना बाहेर काढले.

Leave a Comment