अश्‍व धावले रिंगणी,झाला टाळ, मृदुंगाचा ध्वनी !

palkhi
अकलूज- अश्‍व धावले रिंगणी झाला टाळ, मृदुंगाचा ध्वनी ॥
या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात देवाच्या शिवराज व स्वाराच्या चेतक अश्‍वाने नेत्रदिपक दौड करून लाखो वारकर्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

प्रारंभी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुका निरा स्नानाकडे नेण्यात आल्या. सकाळी 7 वा. पादुकांना निरा स्नान घालण्यात येवून सोहळा 7.30 वा. अकलूज मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळी 8 वाजता नगार्‍याचे आगमन झाले. त्यानंतर 8.15 वाजता तुकोबांच्या अश्‍वांचे आगमन झाले. नगारा व अश्‍वांचे स्वागत पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. अश्‍वांच्या स्वागतानंतर तुकाराम महाराजांचा रथ सोलापूर जिल्हा सिमेवर आला. जिल्हावासियांनी सोहळ्याचे स्वागत केले तर पुणे जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी व प्रशासनाने सोहळ्याला निरोप दिला. यावेळी पालकमंत्री दिलीप सोपल व आ.हनुमंतराव डोळस यांनी रथाचे सारथ्य केले.

सकाळी 9.41 वाजता सोहळा गांधी चौक येथे पोहोचला. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, सौ.नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी जि.प.अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, सरपंच शशीकला भरते, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, विश्‍वतेज मोहिते-पाटील, पं.स.सदस्य पांडुरंगराव देशमुख, फातिमा पाटावाला व हजारो ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या वारकरी दिंडी समवेत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील रथापुढील व रथामागील दिंड्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. ठिकठिकाणी सोहळ्याचे उत्साही स्वागत होत होते.
पालखी गोल रिंगणासाठी सदाशिवराव माने विद्यालयाच्या आखीव रेखीव मैदानावर पोहोचली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मचार्‍यांनी रिंगणासाठी मैदान व्यवस्थित करून दिले होते. त्यानंतर मैदानावर मधोमध पालखी ठेवून वारकर्‍यांनी गोल रिंगण केले. यावेळी पादुकांचे व अश्‍वांचे पूजन खा.विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात रिंगण सोहळ्यात सुरूवातीला सकाळी 10.30 वाजता पताकाधारी, त्यानंतर 10.38 वा.तुळशीवृंदावनधारी व हांडेवाल्या महिला व त्यानंतर 10.45 वा. वीणेकरी यांना एकापाठोपाठ एक रिंगणासाठी सोडण्यात आले. त्यांनी तुकाराम तुकाराम असा नामघोष करीत एक रिंगण पूर्ण केले. टाळ्यांच्या व टाळ, मृदुंगाच्या गजरात चैतन्य निर्माण झाले. खा.विजयसिंह मोहिते-पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी प्रविण गेडाम व जि.प.अध्यक्षा डॉ.निशीगंधा माळी यांनी रिंगण सोहळ्यामध्ये धावून रिंगणाचा आनंद लुटला. त्यानंतर 10.55 वाजता माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या शिवराज या देवाच्या अश्‍वास रिंगणासाठी सोडण्यात आले. शिवराज अश्‍वाने एक रिंगण पूर्ण केल्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या चेतक या स्वाराच्या अश्‍वांसह दौडीस सुरूवात केली. पाहता पाहता दोन्ही अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगणानंतर बाभुळगावकरांचा अश्‍व दर्शनासाठी रिंगणात आणण्यात आला. रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्‍वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पूर्ण झाला. यावेळी भाविकांनी पारंपारिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. रिंगणानंतर सोहळा अकलूज येथील विठ्ठल मंदिरात विसावला. उद्या दि.05 रोजी सकाळी 8 वाजता हा सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ होईल. माळीनगर येथे सोहळ्यातील उभे रिंगण होईल. उद्या सोहळ्याचा बोरगांव येथे मुक्काम आहे.

माळशिरस तालुक्यात संतांच्या पालख्यांचे आगमन- श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासमवेत संत सोपानकाका, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी) यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे माळशिरस तालुक्यात आगमन झाले. या पालखी सोहळ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Leave a Comment