स्टार स्पोर्ट्सवर सचिन तेंडूलकर विरुद्ध शेन वार्न सामन्याचे प्रक्षेपण

sachin
लंडन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गतवर्षी अलविदा करणारा सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात एका प्रदर्शनीय लढतीच्या निमित्ताने उतरणार आहे. या प्रदर्शनीय लढतीत लारा, चंदरपॉल व उमर गुल आदी त्याचे सहकारी खेळाडू असतील तर मुकाबला असेल वॉर्न व मुरलीधरन या दिग्गजांविरोधात! भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी लढतीला सुरुवात होत असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स-3 व 4 या वाहिन्यांवरुन केले जाणार आहे.

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाने 200 वर्षे पूर्ण केली असून त्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनीय लढतीचे आयोजन केले गेले आहे. सचिन एमसीसी एकादशचे नेतृत्व करणार असून या संघात द्रविड, ऍरॉन फिंच, अजमल, उमर गुल, लारा, व्हेटोरी, ब्रेट ली, चंदरपॉल, टेट आदी खेळाडूंचा समावेश आहे. प्रतिस्पर्धी शेष विश्व संघाचे कर्णधारपद शेन वॉर्नकडे असून त्याच्या संघात केविन पीटरसन, आफ्रिदी, मुरलीधरन, टिनो बेस्ट, सेहवाग, युवराज, गिलख्रिस्ट व कॉलिंगवूड आदी खेळाडूंची वर्णी लागली आहे.

यावेळी एखाद्या प्रदर्शनीय लढतीत शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन या दिग्गज फिरकीपटूंनी एकाच संघातून खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग असणार आहे.
विश्व एकादश संघात स्टार खेळाडूंची रेलचेल असून ऍडम गिलख्रिस्ट, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन व शाहिद आफ्रिदीसारख्या धडाकेबाज, स्फोटक फलंदाजांचा त्यात समावेश आहे.

मागील पर्वातील सर्वोत्तम फलंदाज विरुद्ध त्याच पर्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ही लढत रंगेल, असा प्राथमिक होरा आहे. ब्रायन लारा, सचिन
तेंडुलकर, राहुल द्रविड आदी दिग्गज फलंदाज शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन या जागतिक दर्जाच्या फिरकीपटूंना सामोरे जाताना कोणती रणनीती राबवणार, ते यावेळी औत्सुक्याचे ठरणार आहे. सचिन-वॉर्न यांच्यात जागतिक स्तरावर अनेकदा जुगलबंदी रंगत आली असून त्याचीच आणखी एक झलक या लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून येईल.

Leave a Comment