लाखो वैष्णवांची मांदियाळी ; प्रपंचाचा सारा भार पांडुरंगावर

palkhi
नातेपुते – आषाढी वारी केव्हा येईल, पंढरपूरला केव्हा जाईन आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाला केव्हा भेटेन या उत्कट ओढीने ऊन्हाची तमा न बाळगता अलंकापूरीहून आलेल्या संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत झपझप पावले उचलत असून, या सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर धर्मपुरी येथे तोफांच्या सलामीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

सर्वात पुढे चौघडा, त्यामागे अश्‍व व 27 दिंड्या, त्यानंतर माऊलींचा विविध फुलांनी सजवलेला रथ आणि त्यामागे 250 पेक्षाही अधिक दिंड्यांचा दळभार टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर आला. रथाला आज तोरणे, लड्या, गोंडे आदिंची सजावट करण्यात आली होती. त्यासाठी मोगरा, झेंडू, जर्मन आदि फुलांचा वापर करण्यात आला होता.
सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी 6.30 वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे पालखी सोहळा प्रमुख डॉ.प्रशांत सुरू यांच्या हस्ते माऊलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. पंढरी समिप आल्याने वारकर्‍यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. परंतु प्रत्येकाच्या चेहर्यावर दुष्काळाचे मोठे सावट जाणवत होते. येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर खरिपाच्या पेरण्या होणार नाहीत. माणसांना व जनावरांना प्यायला पाणी मिळणार नाही याची चिंता प्रत्येकालाच वाटत होती. तरीही प्रपंचाचा सारा भार एका पांडुरंगावर टाकून वारकरी वाटचाल करीत होते.

सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा सव्वा नऊ वाजता साधुबुवाच्या ओढ्याजवळ पोहोचला. रथातून माऊलींची पालखी उतरविण्यात आली. ती असंख्य भाविकांनी खांद्यावर घेवून माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत साधुबुवांच्या मंदिरात आणली. साधुबुवांच्या पादुकांवर माऊलींच्या पादुका ठेवून तेथे पूजा व आरती करण्यात आली. या सकाळच्या विसाव्यावर न्याहरी उरकून सोहळा सकाळी सव्वा दहा वाजता धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.

दुपारी 12 वाजता हा सोहळा भोजन व विश्रांतीसाठी धर्मपुरी येथे विसावला. शिंगणापूर फाटा येथे सायंकाळचा विसावा घेवून सोहळा रात्री नातेपुते
मुक्कामी विसावला. श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण उद्या सदाशिवनगर येथे होणार असून या रिंगण सोहळ्याची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. रिंगण सोहळ्यानंतर हा सोहळा माळशिरस मुक्कामी पोहोचेल.

Leave a Comment