राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण ? राधाकृष्ण विखेपाटील ,बाळासाहेब थोरात हे शर्यतीत

combo
नवी दिल्ली /मुंबई – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस कामाला लागली आहे. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यात विभागवार समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार ए. के. अँटनी समितीने आपला अहवाल हायकमांडला सादर केला आहे,परिणामी मुख्यमंत्री बदलावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून पणन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील आणि बाळासाहेब थोरात यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी अग्रेसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती . पश्चिम महाराष्ट्रासाठी सुशीलकुमार शिंदे, कोकणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आणि मोहन प्रकाश यांच्या नेतृत्वाची निवड करण्यात आली . विदर्भात जर्नादन चांदूरकर, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे आणि विलास मुत्तेमवार तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडय़ातील काँग्रेसची वाटचाल होणार आहे.या समितीने हायकमांडला अहवाल दिला असून त्यात मुख्यमंत्री हटावची शिफारस करण्यात आली आहे,विशेष म्हणजे कॉंग्रेसमध्येच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठी नाराजी तसेच मित्रपक्ष राष्ट्रवादीचाही तोच आक्षेप असल्याचे मत अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री चव्हाण यांना हटविण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे धरला होता. तेव्हा मुख्यमंत्री बदलल्यास उपमुख्यमंत्री बदलणार का, या काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नावर पवार यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्याच धर्तीवर मुख्यमंत्रीबदलाचा निर्णय राष्ट्रवादीच्या दबावापोटी न घेण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला. मात्र लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या ,तर राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या होत्या ,त्यामुळे विधानसभेला विपरीत परिणाम होऊ नये यासाठी विभागवार समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ,त्यानुसार समितीने अहवाल दिला असला तरी कॉंग्रेसच्या वर्तुळात जी मागणी होती ,त्याला अनुसरून तसेच राष्ट्रवादीची भूमिका काय असू शकते यानुसार सर्व बाबी मांडण्यात आल्या आहेत. त्यात लोकसभा निवडणूक हरलेल्या आठ ते दहा राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदण्याची दाट शक्यता आहे. ज्या राज्यांमध्ये कॉग्रेसचा दारूण पराभव झाला आहे अशा या राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा हकालपट्टी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपद बदलाच्या घडामोडींनी दिल्लीत वेग घेतला असला तरी यापूर्वीच काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि ए. के. अॅन्टनी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती तसेच काँग्रेस अंतर्गतदेखील अनेक नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरु आहे. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असून मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून नारायण राणे ,हर्षवर्धन पाटील ,पतंगराव कदम ,सुशीलकुमार शिंदे हे तूर्तास बाहेर पडले असले असून राधाकृष्ण विखेपाटील ,बाळासाहेब थोरात हे शर्यतीत अग्रेसर ठरले आहेत. यापूर्वी नगर जिल्ह्याला नेहमीच डावलण्यात आले होते ,त्यामुळे आता प्राधान्य मिळते का ?याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment