मुंबई डबेवाल्यांनी दर वाढविले

dabbawala
मुंबई- महागाईच्या झळा असह्य झालेल्या मुंबईतील डबेवाल्यांनी त्यांचे डबा पोहोचविण्याचे दर १०० रुपयांनी वाढविले असून ग्राहकांनी या दरवाढीला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. मुंबई डबावाला असोसिएशनचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेघडे म्हणाले की भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने आम्हाला मिळणार्‍या उत्पन्नात जगणे आता शक्य होत नाही. शेतकर्‍यांप्रमाणे आमच्या डबेवाल्यांनी महागाईला कंटाळून आत्महत्या करू नयेत यासाठी ही दरवाढ करणे भाग पडले आहे.

मुंबईत गेली १२५ वर्षे डबेवाले मुंबईकरांना ही विश्वासू, अतिशय तप्तर अशी सेवा पुरवित आहेत. शहरात सुमारे ५००० डबेवाले अजिबात खाडा न करता ही सेवा मुंबईकरांना पुरवित आहेत. त्यात जसे कर्मचारी आहेत तसेच शालेय विद्यार्थीही आहेत. या डबेवाल्यांना दर महिना ८ ते १० हजार रूपये प्राप्ती होते. दररोज १ लाख डब्यांची ने आण हे लोक करतात. मात्र आता महागाई, पेट्रोल दरवाढीमुळे प्रवासाचा वाढलेला खर्च त्यांना परवडेनासा झाला आहे. दरवर्षी दरवाढ करताना ती कमीत कमी असेल अशी काळजी आवर्जून घेतली जायची मात्र आता तेही अशक्य बनल्याने महिन्याला १०० रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

मुंबईचे डबेवाले हा जागतिक कुतुहलाचा विषय आहे. सिक्स सिग्मा क्लालिटीचे प्रमाणपत्र संघटनेला मिळाले आहे. तसेच त्यांचा जागतिक व्यवसाय फॅन क्लबही असून त्यात ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्लस, रिचर्ड ब्रासन या नामवंताचा समावेश आहे. एकमेवाद्वितीय व्यवस्थापन कार्यपद्धती असलेल्या या संघटनेच्या कामाचा समावेश मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातून करण्यात आला आहे. देशातील अनेक आयआयएम मध्ये हा विषय आवर्जून शिकविला जातो.

Leave a Comment