चीनच्या शिनजियांग प्रांतात रोजा पाळण्यास बंदी

bejing
बिजिग – चीनच्या शिनजयांग प्रांतात रोजे पाळण्यास सरकारने बंदी घातली असल्याचे चीनच्या सरकारी वेबसाईटवरून जाहीर करण्यात आले आहे. जगभरातील मुस्लीम बांधवांचा रमझान किंवा रमादान हा पवित्र महिना २८ जूनपासून सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे रोजे पाळले जातात. मात्र पश्चिम चीनमधील वरील भागात हे उपवास ठेवण्यावर बंदी आली असून सरकारी कार्यालये, रूग्णालये, शाळा अशा सर्वच ठिकाणी ही बंदी लागू करण्यात आली आहे. या भागात सुमारे २.२ कोटी मुस्लीम राहतात.

केवळ रोजे पाळण्यावरच नव्हे तर रमझान निमित्ताने केले जाणारे अम्य धार्मिक कार्यक्रमही या भागात मुस्लीमांना साजरे करता येणार नाहीत. तसेच विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कर्मचारी, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य त्यात अगदी नर्सेस पासून ते इंजिनिअर, विद्वान यांनाही उपवास करण्यावर बंदी लागू झाली आहे. काही रूग्णालयातील कर्मचार्‍यांकडून तर रोजे पाळणार नाही असे लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आले आहे असेही समजते.

मुस्लीम समाजाने हा त्यांच्या संस्कृतीवर हल्ला असल्याने या बंदीचा निषेध केला आहे. मात्र मुस्लीमांकडून या भागात केल्या गेलेल्या हल्ल्यांमध्ये शेकडो चीनी लोक जीवास मुकले असल्याने ही बंदी आणण्यात आल्याचे सांगितले जात आहे. २००९ साली झालेल्या हिंसाचारात २०० जण ठार झाले होते. त्यासंबंधात डझनावारी मुस्लीमांना अटक करण्यात आली होती व त्यातील १३ जणांना शिक्षाही सुनावल्या गेल्या आहेत. हे दंगेखोर आता मूळ प्रांत सोडून शिनजियांग भागात आले असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

Leave a Comment