नवी दिल्ली – सध्याची जगातील अग्रगण्य सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सॅंडबर्ग यादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्या आहेत. सॅंडबर्ग यांनी गुरुवारी मोदी यांची भेट घेतली.
मोदींनी घेतली फेसबुकच्या सीओओची भेट
फेसबुकवर मोदी जगातील दुसऱया क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांचे फेसुबकवर तब्बल १८ कोटी चाहते आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. मोदी यांनी निवडणुकीतील विजयानंतर आपल्या आईचा आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. त्यांच्या या फोटोचे सॅंडबर्ग यांनी कौतुक केले.
सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी आणि प्रशासनासाठी फेसबुकचा चांगला वापर होऊ शकतो, असे मोदी यांनी सॅंडबर्ग यांची भेट घेतल्यानंतर म्हटले आहे. लोकांशी थेट संवाद साधणे हे प्रशासनाच्या दृष्टीने काहीसे अवघड असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. परदेशी पर्यटक भारतात आणण्यासाठी फेसबुकचा कसा वापर होऊ शकतो, याबाबतही सॅंडबर्ग यांच्याशी बोलणे झाल्याचे मोदी यांनी सांगितले. बुधवारी नवी दिल्लीत निवडक पत्रकारांशी संवाद साधताना सॅंडबर्ग यांनी आपणही मोदींच्या चाहत्या असल्याचे सांगितले.