बोगोटा : फिफा वर्ल्डकप २०१४ च्या क्वार्टरफायनलमध्ये कोलंबियाचा यजमान ब्राझीलशी सामना होणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलंबियाने बोगोटामध्ये पीठ आणि शेव्हिंग फोमवर बंदी आणली आहे.
कोलंबियात शेव्हिंग फोम, पीठावर बंदी
फूटबॉलवेड्या या देशातील हजारो उत्साही लोक या सामन्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. कोलंबियामध्ये लोक शेव्हिंग क्रिम फेकून किंवा पीठाचे ‘बॉम्ब’ फोडून आपला आनंद व्यक्त करताना दिसतात.
मात्र पोलिसांना या प्रकाराला आळा घालायचा आहे. कारण अशा प्रकारांमुळे वाद, हाणामाऱ्याही होऊ शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. मॅच दरम्यान पोलीस राजधानीत तैनात राहतील. कोलंबियात मॅचच्या दिवशी दारू विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
कोलंबियाचे राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सांतोस फोर्टालेजामध्ये आपल्या टीमच्या या मॅचचा आनंद घेतील. त्यांना आपल्या देशवासियांना शांततेचे आवाहन केले आहे.