सिंधी समाजाचा आदर्श

sindhi
माहेश्‍वरी अर्थात मारवाडी समाजाने जवळ भांडवल नसतानाही व्यापार-उद्योग वाढवून समाजात आपले स्थान कसे उंचावले हे आपण पाहिले आहे. या क्षेत्रातला मारवाडी समाजापेक्षा सिंधी समाजाचा पराक्रम जास्त अनुकरणीय आहे. कारण माहेश्‍वरी समाज त्यांच्या भागात दुष्काळ पडल्यामुळे हळू हळू करीत भारतभर स्थलांतरित झाला आहे. तो भारतातून भारतात गेलेला आहे. परंतु सिंधी लोक पाकिस्तानातून हाकलेले गेलेले आहेत आणि तेही अतीशय वाईट पद्धतीने. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत हे दोन देश अस्तित्वात आले. पाकिस्तानची उभारणी मुस्लीम देश म्हणून झाली, त्यामुळे तिथे हिंदू लोक अल्पसंख्य ठरले. फाळणीच्या वेळी त्या भागात भीषण जातीय दंगली झाल्या आणि त्यात हिंदूंचे खूप नुकसान झाले. त्यामुळे तिथून भारतात पळून आलेले सिंध प्रांतातले हिंदू म्हणजेच आपण ज्यांना सिंधी म्हणतो ते लोक. ते परदेशातून अंगावरच्या कपड्यानिशी पळून आलेले लोक आहेत. अतीशय दैन्यावस्थेत सर्वस्व गमावून ते भारतात आले. त्यांच्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मोठ्या मालमत्ता होत्या, जमिनी होत्या, दुकाने होती. मोठ-मोठे वाडे, बँकांतले पैसे असे सारे सोडून ते लोक भारतात आले आणि त्यांना भारताच्या नव्या सरकारने उल्हासनगर आणि तराई भागात रहायला जागा दिल्या. ही मंडळी सरकारने दिलेल्या या जागांवर काही दिवस निर्वासित म्हणून तंबूत रहात होती.

विस्थापित होऊन आल्यामुळे एकाच कुटुंबातल्या लोकांची फाटाफूट झालेली होती. पहिले वर्षभर तर आपली माणसे शोधण्यातच वेळ गेला आणि नंतर हे लोक हळू हळू सुस्थिर व्हायला लागले. त्यांना अजूनही काही लोक निर्वासित म्हणतात. खरे म्हणजे ते आता भारतात एकरूप होऊन गेलेले आहेत, ते निर्वासित राहिलेले नाहीत. त्यांनी अशा विपन्नावस्थेत भारतात येऊन सुद्धा खिशात एक पैसाही नसताना व्यापार सुरू केला. आपण सिंध प्रांतात फार श्रीमंत होतो हे विसरून जाऊन या लोकांनी हाती पडेल ती कामे करायला सुरुवात केली. लहान दुकानदारांपर्यंत प्रत्यक्षात जाऊन गोळ्या-बिस्किटांचा पुरवठा करणे, रस्त्यावर त्यांची फेरीवाल्यासारखी फिरून विक्री करणे अशी छोटी छोटी कामे करीत हा सिंधी समाज व्यापारात शिरला आणि आज समाजातल्या श्रीमंत वर्गात जाऊन बसला. मराठी माणसाला उद्योग करण्याचा सल्ला दिला की, भांडवलाचा बहाणा आठवतो. पण अंगावरच्या कपड्यानिशी भारतात येऊन सिंधी लोकांनी भांडवलाशिवाय आपले साम्राज्य निर्माण केलेले आहे याचे उदाहरण आपण आता डोळ्यासमोर ठेवत नाही.

या लोकांची धंद्याविषयी असलेली समर्पण भावना, शून्यातून विश्‍व निर्माण करण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी या गुणांनीच त्यांनी भांडवलाच्या अडचणीवर मात केली आहे. खिशात दमडाही नसताना ते करोडपती झालेले आहेत आणि तसे करोडपती होता येते हे त्यांनी सिद्ध करून दिले आहे. ही गोष्ट सिंधी, मारवाडी, गुजराती याच लोकांना का जमते? मराठी लोकांना ती का जमत नाही असे प्रश्‍न नेहमी विचारले जातात आणि या लोकांच्या रक्तातच उद्योग आहे असे त्याचे कारण दिले जाते. कोणाच्याही रक्तामध्ये कोणताच उद्योग नसतो. मराठी लोकांच्या रक्तातही उद्योग आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत: मराठी भाषिकांमध्ये उद्योगधंदे करण्यास मुलांना प्रेरणा देणारे वातावरण नाही. एखादा मराठी भाषिक मुलगा उद्योगधंद्यात शिरण्याचा विचार करायला लागतो तेव्हा त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगून उद्योग करण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला उद्योगापासून परावृत्त केले जाते. त्याची चेष्टा केली जाते. आपल्याला उद्योग करता येत नसतो, आपण तो करायचा नसतो असे त्याला समजावले जाते. नोकरीच करणे कसे चांगले आणि सुखाचे आहे हे त्याला सांगितले जाते. उद्योगात शिरणार्‍या मराठी माणसाला प्रत्यक्ष मदत करणे तर दूरच पण उलट त्याचे पाय ओढले जातात.

या उपरही एखाद्या मराठी तरुणाने उद्योगात उडी घेण्याचे साहस केलेच तर समाजात तशी परंपरा नसल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा नवखेपणामुळे धंद्यात तोटा येतो. अशावेळी त्याला धीर देण्याऐवजी त्याला टोमणे मारले जातात आणि त्याने उद्योगधंद्याचा नाद सोडून मोकाटपणे एखादी नोकरी शोधावी असा सल्ला त्याला दिला जातो. व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मारवाडील, गुजराती, सिंधी समाजामध्ये असे होत नाही. त्या समाजात मुलाने नोकरी करणे कमीपणाचे समजले जाते. एखादा तरुण धंद्यात अपयशी झाला तर त्याला कोणी टोमणे मारत नाहीत. उलट हा धंदा जमला नाही तरी हरकत नाही दुसरा धंदा कर, असे प्रोत्साहन दिले जाते. मराठी माणसाची मनोवृत्ती नेमकी याच्या उलट आहे. ती बदलल्याशिवाय उद्योगधंद्यात शिरू इच्छिणार्‍या मराठी मुलांना तसे धैर्य येणार नाही. एकदा वातावरण बदलले पाहिजे आणि आपणही शिकून सवरून नोकरीसाठी लोकांसमोर हात पसरण्याऐवजी स्वावलंबी होऊन आपली उपजीविका साधावी ही प्रेरणा मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे.

Leave a Comment