राज्यात पावसाची दमदार एन्ट्री; मुंबईला झोडपले

mumbai-rain
मुंबई- गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात दमदार आगमन केले असून, पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, महाबळेश्वर, कोयना या भागात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. दक्षिण मुंबईत पावसाच्या सरी अधूनमधून पडत आहेत. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीसह ठाण्यातील कोलशेत, कोपरी परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. तर, गोरेगाव ते बोरीवली या भागांत सकाळी ढगाळ वातावरण होते. साडेदहा नंतर या भागातही पावसाने हजेरी लावली आहे.

स्कायमेट या खासगी वेधशाळेने मुंबईत बुधवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सलग तीन तासात १०४ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगितले.
मुंबईतील परळ, हिंदमाता, लालबाग भागात दरवेळी प्रमाणे यंदाही पाणी साचले आहे. कुर्ला येथे मिठी नदीत दोन मुले वाहून गेली असून त्यांचा शोध सुरु आहे. तसेच मानखूर्द येथे पाणी साचल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. ब-याच वेळाने मानखूर्द येथून सीएसटीकडे निघालेली पनवेल गाडी पून्हा पनवेलकडे रवाना झाली. यामुळे अनेक प्रवासी मानखूर्द येथे अडकले आहेत.

भांडूप ते घाटकोपर एलबीएस मार्गावर पाणी साचले. मुंबईतील परळ, दादर, एल्फिंन्स्टन, करी रोड, लालबाग परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, खार, मिलन आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचले आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गुरु तेज बहादूर नगर आणि चुनाभट्टी व कुर्ला येथे रेल्वे पटरीत पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रृतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

पश्चिम द्रृतगती महामार्गावर खेरवाडी ते विमानतळ परिसर आणि जोगेश्वरी ते सांताक्रूज विमानतळ वाहतूक कोंडी झाली आहे.पावसाने मुंबईत ख-या अर्थाने अद्यापही दमदार हजेरी लावली नसली तरी, जून महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा आल्याने मुंबईकर खूष झाले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. उरण, पनवेलमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

Leave a Comment