बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता

bor
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांनी आज मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने एका प्रस्तावाद्वारे या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठविलेल्या शिफारशींना आज मंत्र्यांनी मान्यता दिल्यामुळे देशातला ४७ वा व्याघ्र प्रकल्प साकारणार असून, महाराष्ट्रातील हा सहावा व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे.
याआधी महाराष्ट्रात ताडोबा, मेळघाट, पेंच, नागझिरा आणि सह्यांद्री हे पाच व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत.

राज्य शासनाने १९७० साली या परिसरातील जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला होता. वर्धा जिल्ह्यात असलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती तसेच वाघांसह अनेक प्रकारचे परभक्षी, पक्षी, प्राणीही आहेत. या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचाही वावर मोठ्या प्रमाणावर असतो. सातपुडा-मायकेल परिसर आणि लगतच असलेला बोर नदीचा किनारा या अभयारण्याची शोभा वाढवतो. या अभयारण्याला राज्यातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचा कॅरिडॉर मिळालेला आहे. शिवाय हा संपूर्ण परिसर व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.

व्याघ्र प्रकल्पाची मान्यता मिळाल्यानंतर त्या परिसरातील व्याघ्र संवर्धनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होईल व तांत्रिक सहकार्यही मिळेल. त्यामुळे व्याघ्र संरक्षण प्रकल्प बळकट होईल. पर्यावरणीय अनुकूल विकासही साधता येईल. परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय, संबंधित मंत्रालयाने आज राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने केलेल्या शिफारशींनाही मंजुरी दिली आहे.

Leave a Comment