बेकारी कितपत खरी?

unemployment
आपल्या देशात बेरोजगारी फार आहे, असे नेहमीच म्हटले जाते. पण ते अर्धसत्य आहे. कारण बेरोजगारी आहे हे खरे असेल तर बर्‍याच लोकांना कामांना माणसे नाहीत ही परिस्थिती का निर्माण झाली आहे. आपल्याला या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. काही लोक बेरोजगारीचे आकडे जाहीर करतात तर काही लोक कामाला माणसेच मिळत नाहीत म्हणून कामे रद्द करतात. या दोन परस्पर विसंगतीतून आपल्याला बेरोजगारीच्या समस्येचा अभ्यास करावा लागेल. आपल्या देशात २०११ च्या जनगणनेत बेरोजगारांच्या संख्येबाबत काही माहिती कळालेली आहे. तिच्यानुसार देशातल्या तरुणांमध्ये साधारणतः २० टक्के तरुण बेरोजगार आहेत. या दोन परस्पर विरोधी माहितीचा मेळ कसा घालायचा? आणि दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत की नाही यावर विश्‍वास कसा ठेवायचा? २० टक्के बेकारांचा आकडा सरकारी पाहणीतून कळलेला आहे आणि माणसे मिळत नाही हा नित्याचा अनुभव आहे. म्हणजे एकंदरीत देशात काम आहे पण कामाला माणूस मिळत नाही. माणसे खूप आहेत पण माणसाला काम मिळत नाही. बेरोजगारीविषयी चर्चा करताना नेहमीच हा मुद्दा समोर येतो.

एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात एखादी जागा रिकामी असल्याची माहिती कळली तरी त्या जागेवर शेकडो लोकांच्या उड्या पडतात आणि दुसर्‍या बाजूला एखाद्या कंपनीमध्ये विशिष्ट कौशल्य अवगत असलेल्या काही जागा रिकाम्या असूनसुध्दा त्या जागांसाठी कोणी अर्जही करायला तयार होत नाही. या दोन प्रकारच्या माहितीतून भारतातल्या बेरोजगारीचे एक विशिष्ट स्वरूप समोर येेते. ते म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे चांगल्या नोकर्‍या मागणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. चांगल्या नोकर्‍या निर्माणही होत आहेत. परंतु त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त केलेल्या तरुणांची वानवा आहे. ही परिस्थिती आजची नाही. पूर्वीपासून तशी ती आहे. कारण नोकर्‍या आणि शिक्षण यांचा मेळ घालण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत. शिक्षण घेतलेला कोणताही तरुण किंवा तरुणी आपण शिकलो आहोत म्हणजे आपल्याला शक्यतो सरकारी किंवा न जमल्यास निमसरकारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा धरते आणि त्यांना तशी नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांची गणना बेरोजगारात केली जाते. बेरोजगारीचे आणखी एक स्वरूप विचार करायला लावणारे आहे. हजारो तरुण काही ना काही करून पोट भरत असतात. त्यांचे उत्पन्न क्वचित चांगले किंवा सामान्य असते. पण त्याने ज्या नोकरीची इच्छा बाळगलेली असते ती नोकरी मिळेपर्यंत तो स्वतःला बेरोजगार म्हणवत असतो.

अशा ऐच्छिक बेरोजगारामध्ये आता मुलींचाही समावेश झाला आहे. कारण शिकलेली प्रत्येक मुलगी नोकरी मागत आहे. पूर्वी मुलीला नोकरी नाही म्हणजे ती बेकार आहे असे म्हटले जात नव्हते. गृहिणीपद ही तिची नोकरीच होती. आता मात्र मुली गृहिणी होण्यावर समाधानी नाहीत. आपण शिकत आहोत म्हणजे आपल्याला पांढरपेशी नोकरी मिळाली पाहिजे अशी तिची अपेक्षा आहे. अशी ऐच्छिक बेकारी मोठ्या प्रमाणावर असते. महाराष्ट्रात त्याचे एक उदाहरण बघण्यासारखे आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात डी.एड. आणि बी.एड. करण्याचे वेड बरेच फोफावले होते. हे अभ्यासक्रम पूर्ण केले की, प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक म्हणून सहजपणे चांगली नोकरी मिळते. असा समज रूढ झाला होता. त्यामुळे प्रसंगी मोठ्या देणग्या देऊन हजारोच नव्हे तर लाखों तरुणांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले. दुसर्‍या बाजूला एवढ्या लोकांना नोकर्‍या मिळण्याची काहीच सोय नव्हती. कारण डी.ए.ड. बी.एड. होणारे विद्यार्थी लाखो असले तरी नोकर्‍या काही हजारच निर्माण होत होत्या. म्हणजे हजारो तरुण तरुणी स्वतःला बेकारीच्या खाईत लोटत होत्या.

राज्यात डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रम करणार्‍या किती मुलांची गरज आहे. याचा कोणी विचारच केला नाही. भरमसाठी महाविद्यालयांना परवानगी देतानाही सरकारने विचार केला नाही आणि तिथे प्रवेश घेण्यास गर्दी करणार्‍या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही विचार केला नाही. परिणामी, लाखो डी.एड. आणि बी.एड. गावागावात बेकार आहेत. यातल्या बर्‍याच लोकांनी आता आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी लागणार नाही असे म्हणून शिक्षकाच्या नोकरीचा नाद सोडून दिला आहे. ते अन्य व्यवसायात आहेत आणि शिक्षक झाले असते तर जेवढा पगार मिळणार होता त्यापेक्षा अधिक कमाईसुध्दा करत आहेत. अशा लोकांची संख्या कमी असेल परंतु ते डी.एड. किंवा बी.एड. झाले आहेत आणि त्यांना शिक्षकाची नोकरी मिळत नाही म्हणून ते प्रदीर्घ काळ व्यवसाय असूनही स्वतःला बेकार म्हणवतात. या मुलांनी बी.एड. न करता संगणक शास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण केले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती. कारण संगणकाशी संबंधित असलेली कौशल्ये प्राप्त करून त्या क्षेत्रात नोकरी करू इच्छिणार्‍या तरुणांची वानवा आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या काही कौशल्याचे ज्ञान असणारी मुले मिळत नाहीत म्हणून काही भारतीय कंपन्यांनी नवे उद्योग उभारण्याच्या कल्पना सोडून दिल्या आहेत. दुसर्‍या बाजूला हजारो लोक बेकार आहेत पण ते बेकार या कंपन्यांच्या उपयोगाचे नाहीत. कारण त्यांच्याकडे ते विशिष्ट कौशल्य नाही. म्हणजे देशातली बेकारी शिक्षण आणि कौशल्याची गरज यांचा मेळ न घातल्यामुळे निर्माण झालेली आहे.

Leave a Comment