पावसाची हुलकावणी

rain
भारताची अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून असते असे म्हटले जाते. त्यामुळे जून महिना उजाडला की, केवळ शेतकरीच नाही तर देशाचे अर्थमंत्रीसुध्दा आभाळाकडे डोळे लावून बसतात. आता या परिस्थिती थोडा बदल झाला आहे. पाऊस कमी पडला म्हणून किंवा दुष्काळ पडला म्हणून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची स्थिती आता राहिलेली नाही. दुष्काळाचे विशिष्ट स्वरूप आपण पाहत आलो आहोत. देशात दुष्काळ पडतात पण दरवर्षी काही विशिष्ट राज्ये दुष्काळग्रस्त होतात. कधी महाराष्ट्रात दुष्काळ जाणवतो तर कधी कर्नाटकात. कधी मध्य प्रदेश दुष्काळाच्या खाईत असतो तर कधी बंगालला त्रस्त करतो. मात्र या वर्षी सगळ्या भारतातच पावसाने डोळे वटारले आहेत. तूर्तास तरी पूर्ण देशावर अनावृष्टीचे संकट भेडसवायला लागले आहे. यावेळच्या दुष्काळाचे हे दुर्दैवी वैशिष्ट्य आहे. दर वर्षी महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसायला लागतात. तेव्हा जून-जुलै महिना महाराष्ट्रभर दुष्काळाच्या चर्चेचा असतो. पण यावेळचे चित्र फार गंभीर आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत देशच दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. जून महिना संपला तरी महाराष्ट्रात पावसाचा टिपूस नाही. देशातही हेच चित्र आहे.

देशाचा मोठा भाग सर्वाधिक गंभीर स्वरूपाच्या अनावृष्टीचा अनुभव घेत आहे. देशात दरसाल पडणार्‍या पावसापैकी १७ टक्के पाऊस एकट्या जून महिन्यात पडत असतो. यंदा तो ४३ टक्के कमी झाला आहे. याचे परिणाम पूर्ण देशावर जाणवणार आहेत. पाऊस कमी पडला की, धान्याची चिंता भेडसावयाला लागते. परंतु सुदैवाने आपल्या देशात हरितक्रांती झाल्यामुळे पावसाने थोडी ओढ दिल्याबरोबर धान्याची फार चिंता करायची गरज राहिलेली नाही. धान्याच्या अभावी उपासमार होण्याची परिस्थिती राहिलेली नाही. सरकारच्या गोदामांमध्ये असलेल्या शिल्लक साठ्यामधून गरज भागवता येते. परंतु धान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरात या हंगामात काहीच पडत नाही. परिणामी खरीप धान्यावर ज्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे त्या शेतकर्‍यांचे उत्पन्न घटते आणि त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. सध्या आपल्या देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाचा १८ टक्के एवढाच हिस्सा शेतीतून येत असतो. परंतु हा हिस्सा कमी असल्यामुळे कोणी निश्‍चिंत व्हावे अशी स्थिती नाही. हा हिस्सा केवळ १८ टक्के असला तरी त्यावर अवलंबून असणारा वर्ग लोकसंख्येच्या ५० टक्के एवढा आहे. म्हणजे उत्पन्नात १८ टक्के घट होते मात्र ५० टक्के जनतेला त्याचे चटके बसतात.

त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यांची क्रयशक्ती घटते. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येकडून औद्योगिग मालाची मागणी होत नाही आणि त्यामुळे शहरांमध्ये होणार्‍या औद्योगिक उत्पादनांनाही झळ पोहोचते. पाऊस न पडण्याचा दुसरा परिणाम जनावरावर होतो. शेतीच्या उपयोगी पडणार्‍या जनावरांना सांभाळणे शेतकर्‍यांना अशक्य होऊन बसते. जनावरांच्या चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर होतो. कमी पावसाचा सर्वाधिक गंभीर परिणाम विजेच्या उत्पादनावर होतो. ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाच्या साह्याने जलविद्युत तयार केले जाते तिथे वीज उत्पादन कमी व्हायला लागते आणि विजेचा पुरवठा कमी झाला की उद्योगांचे उत्पादन घटते. कारण वीज ही उद्योगासाठीची सर्वाधिक महत्त्वाची पायाभूत सोय आहे. आता असे परिणाम जाणवायला सुध्दा सुरूवात झाली आहे. मात्र हवामान खात्याचे अधिकारी अजूनही निश्‍चिंत आहेत. त्यांच्या मते पाऊस पडणार आहे पण तो थोडा उशिरा पडणार आहे आणि त्यांच्या अंदाजानुसार जूनमध्ये पाऊस कमी पडला तरी या कमी पावसाची कसर जुलै आणि ऑगस्टमध्ये भरून निघणार आहे. या दोन महिन्यात अतिवृष्टी होऊन पावसाची सरासरी भरून निघेल. त्यांच्यादृष्टीने ही गोष्ट किरकोळ आहे.

परंतु असा जूनमध्ये नगण्य आणि जुलै – ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडून पावसाचा समतोल टिकला नाही तर शेतीचे मोठे नुकसान होते. कारण जूनमध्ये अनावृष्टीने नुकसान होते तर जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने नुकसान होते. शिवाय जुलै-ऑगस्टमध्ये जलाशय न भरल्यामुळे जवळ जवळ दोन महिने लोकांना पाण्याचा पुरवठा टँकरने करावा लागतो. टँकरने पाणी पुरवले जाते. लोकांना ते कामापुरते मिळते परंतु पाणी मिळवण्यात त्यांचा बराच वेळ जातो. टँकरने पाणी पुरवठा करणारे टँकरचे चालक मनमानी करतात. त्यामुळे दुष्काळग्रस्त लोकांचे फार हाल होतात. दिवसभरात पाणी मिळवणे हेच काम महत्त्वाचे होऊन बसते. या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या उत्पादन क्षमतेवर आणि उत्पन्नावर किती गंभीर परिणाम होत असतो. याचा अंदाजही करवत नाही. मराठवाडा आणि विदर्भासारखे महाराष्ट्रातले मागासलेले भाग दुष्काळाखाली सतत होरपळलेले असतात. मराठवाड्यात विकास होत नाही, विदर्भ सतत मागे असतो कारण तिथल्या लोकांमध्ये विकासाच्या प्रेरणा बळकट नाहीत. असे म्हटले जाते. पण दर दोन-तीन वर्षांनी अनावृष्टी आणि दुष्काळ यामुळे सर्वस्व हिरावले जाणे आणि थोडाबहुत चांगला पाऊस पडला की पुन्हा स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करणे ही जर त्यांची जीवनरहाटी असेल आणि सारा जीवनाचा संघर्ष या एकाच गोष्टीभोवती होत असेल तर त्यांच्या विकासाच्या प्रेरणा बळकट होणार कशा?

Leave a Comment