पंढरी समीप आल्याने उत्साह वाढला

palkhi
बरड – हरीने माझे हरिलें चित्त । भार वित्त विसरले ॥
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या या गवळणीप्रमाणे आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात देहभान हरपून हरिमय झालेला हजारो वैष्णवांचा मेळा बुधवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी बरड येथे विसावला. उद्या गुरूवार दि.3 रोजी साधुबुवांच्या ओढ्यावरील धार्मिक विधीनंतर हा सोहळा धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.

पहाटे पालखी सोहळा प्रमुख डॉ.शिवाजीराव मोहिते यांच्या हस्ते माऊलींची पवमान पूजा व रूद्राभिषेक घालण्यात आला. या पूजेचे पौरोहित्य मुरलीधर प्रसादे, प्रसाद जोशी, राजाभाऊ चौधरी व अमोल गांधी यांनी केले. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

ज्ञानेश्‍वर मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थानच्यावतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक, श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था इत्यादिंच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. फलटण नगरीचा निरोप घेवून माऊलींचा सोहळा वटवृक्षाच्या गर्द झाडीतून वाटचाल करीत सकाळच्या न्याहरीसाठी 9 वाजता विडणी येथे पोहोचला. शेतामध्ये वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली व 9.30 वा. सोहळा पुढे मार्गस्थ झाला. विडणी ते पिंपरद या वाटचालीत वारकर्‍यांच्या स्नानासाठी पिंपरदचे प्रगतिशील बागायतदार बाळासाहेब घनवट, बाळासाहेब बोराटे व शामराव शिंदे यांनी शॉवरची सोय केली होती. या इंग्लिश स्नानाने वारकरी वारीच्या वाटचालीत सुखावून गेले. सोहळा दुपारचे नैवेद्य व भोजनासाठी पिंपरद येथे दुपारी 11.30 वाजता पोहोचला. येथे सोहळ्याचे स्वागत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.

दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर सोहळा निंबळक फाटा येथे पोहोचला. या वाटचालीत ढगाळ वातावरण झाले. वारकर्‍यांना पावसाची अपेक्षा होती. परंतू मेघराजाने पुन्हा हुलकावणी दिल्याने वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंतेची लहर पसरली. अशा वातावरणातच पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरील उत्साह मात्र कमी झाला नव्हता. निंबळक फाटा ते बरड या वाटचालीत हिंगोलीचे खासदार राजीव सातव हे 153 क्रमांकाच्या दिंडीमध्ये सहभागी झाले व त्यांनी वारीचा आनंद लुटला. निंबळक फाटा येथील विसाव्यानंतर सोहळा सायंकाळी बरड मुक्कामी विसावला.

आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह उद्या गुरूवारी सकाळी 11 वाजता धर्मपूरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली केली असून आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवली आहे.

Leave a Comment