जागा वाटपावरून महायुतीत कलगीतुरा !

sena
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जागावाटपावरून महायुतीत आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ६५, राष्ट्रीय समाज पक्षाने ३0 ते ३५, तर रिपाइंने २५ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुतीत जागावाटपावरून कलगीतुरा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला भरभरून मतदान झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला ,परिणामी महायुतीच्या नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. शिवसेना आणि भाजपाच्या युतीत आता रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम या पक्षांचा समावेश असल्याने युती आता महायुती झाली आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपाचे १६९ आणि ११९ हा जागावाटपाचा फॉम्र्युला बदलून समसमान जागावाटप झाले पाहिजे, अशी मागणी भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातून सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपमधला जागावाटपाचा फॉम्र्युला अद्यापि ठरलेला नसतानाच महायुतीतील घटक पक्षांनीदेखील जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यास आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यात रामदास आठवलेंच्या रिपाइंने २५, स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी ६५, तर रासपच्या महादेव जानकरांनी ३५ जागांवर आतापासूनच दावा केला आहे. जागावाटपाचा मुद्दा हा शिवसेना-भाजपासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. आधी शिवसेना-भाजपात जागावाटप करायचे आणि मग या सहयोगी पक्षांना आपापल्या कोट्यातून जागा द्यायच्या की स्वतंत्रपणेच जागावाटप करायचे या मुद्दय़ावर अजून शिवसेना-भाजपात एकमत झालेले नाही.

Leave a Comment