कंपोस्ट खत कंपोस्ट खत कसा करावा – २

composite
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेला कचरा साचवून ठेवला पाहिजे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डा खोदावा लागतो, असे सांगितले जाते. मात्र हा खड्डा किती लांब आणि किती रुंद असावा याचा निर्णय आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सेंद्रीय कचर्‍याच्या प्रमाणात केला पाहिजे. कचरा भरपूर असेल तर खड्ड्याची लांबी, रुंदी भरपूर ठेवावी. कमी असेल तर लांबी, रुंदी कमी ठेवावी. परंतु कोणत्याही स्थितीत खड्ड्याची खोली तीन ते साडेतीन ङ्गुटापेक्षा अधिक असता कामा नये. हे पथ्य कंपोस्ट खतामध्ये पाळणे आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खड्डा केलाच पाहिजे असेही काही नाही. ढीग पद्धतीनेही कंपोस्ट खत तयार करता येतो. आपण जो कंपोस्ट खत तयार करणार आहोत तो जीवाणू खत वापरून करणार आहोत. त्यासाठी शेणांनी युक्त असे एक मिश्रण आपल्याला वापरायचे आहे. त्यासाठी दोनशे लिटर क्षमतेचा एक ड्रम घ्यावा. त्यात २०० लिटर पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये दहा किलो यूरिया आणि आठ किलो सिंगल सुपर ङ्गॉस्ङ्गेट चांगले विरघळवावे. दुसरा याच क्षमतेचा म्हणजे २०० लिटर क्षमतेचा आणखी एक ड्रम घ्यावा आणि त्या ड्रममध्ये २०० लिटर पाण्यामध्ये एक किलो डिकंपोझिंग कल्चर, पाच किलो साधा गूळ आणि पाच ते दहा टोपली शेण (शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्या सुद्धा चालतील) एवढ्या गोष्टी मिसळाव्यात. म्हणजे आपल्या जवळ दोन ड्रममध्ये दोन वेगवेगळी रसायने तयार आहेत.

पहिल्या ड्रममध्ये दोन रासायनिक खतांचे मिश्रण आहे, तर दुसर्‍या ड्रममध्ये डिकंपोझिंग कल्चर, शेण आणि गूळ यांचे मिश्रण आहे. दोन ड्रममध्ये मिळून तयार झालेले हे ४०० लिटर रसायन आता अंदाजे एक टन (१० क्विंटल) कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास उपयुक्त आहे. आता आपण कंपोस्ट खत प्रत्यक्षात तयार करू. तीन ते साडेतीन ङ्गूट खोलीचा खड्डा तयारच आहे. या खड्ड्यामध्ये आपण साचवलेला सर्व प्रकारचा पाला-पाचोळा, वेगवेगळ्या पिकांचे अवशेष आणि जनावरांचे शेण टाकायचे आहे. सुरुवातीला हा सारा पाला-पाचोळा आणि शेण एकमेकात मिसळत त्यांचा एक ङ्गुटाचा थर खड्ड्यामध्ये टाकावा. त्यानंतर आपण पहिल्या ड्रममध्ये तयार केलेले यूरिया आणि सुपर ङ्गॉस्ङ्गेटचे मिश्रण ८० लिटर एवढे घेऊन ते या थरावर समप्रमाणात शिंपडावे. त्यानंतर या थरावर थोडेसे पाणी सोडावे. साधारणत: ३० ते ५० टक्के एवढा ओलावा होईल एवढे पाणी सोडावे आणि त्यानंतर दुसर्‍या ड्रममधील डिकंपोझिंग कल्चर, शेण आणि गूळ यांचे केलेले मिश्रण ८० लिटर एवढे घेऊन ते या थरावर शिंपडावे.

ही सारी प्रक्रिया नीट वाचावी आणि त्यातील सर्व सूचनांचा अंमल करून कचरा भरावा. यानंतर असाच दुसरा थर टाकावा. म्हणजे सुरुवातीला शेण आणि पाला-पाचोळा यांचे मिश्रण टाकावे, त्याचा थर करावा. त्यावर पहिल्या ड्रममधील ६० लिटर मिश्रण शिंपडावे. हा थर ३० ते ५० टक्के एवढा ओलावा निर्माण होईल एवढा ओला करून घ्यावा आणि त्यानंतर त्यावर दुसर्‍या ड्रममधील ६० लिटर मिश्रण शिंपडावे. तिसरा थर ही असाच भरावा. हे तीन थर भरल्यानंतर खड्डा आटोकाट भरत नाही. तो तसा भरण्याची गरजही नाही. अर्धा ङ्गूट कमी भरला तरी चालेल. खड्डा भरण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता या खड्ड्यामध्ये सातत्याने ५० ते ६० टक्के ओलावा राहील एवढे पाणी सोडत रहावे. खड्डा भरल्यानंतर पंधरा दिवसांनी कचरा ङ्गावड्याने खाली-वर करावा आणि ओल ५० ते ६० टक्के राहील असे पाणी द्यावे.

दर पंधरा दिवसांच्या अंतराने कचरा खाली-वर करणे गरजेचे आहे. हे काम पंधरा दिवसांनी एकदा असे तीन वेळा करावे. त्यामुळे खड्ड्यातील कचरा लवकर कुजण्यास मदत होते. या खड्ड्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा ६० ते ७० अंंश से.तापमान निर्माण होत असते. ही उष्णता बाहेर पडावी यासाठी कचरा खाली-वर करावा लागतो. एकदा ही प्रक्रिया गतीमान झाली आणि खड्ड्यातल्या कचर्‍याचे विघटन होऊन कचरा कुजण्याची प्रक्रिया पूर्णत्वास येत गेली की तापमान कमी व्हायला लागते. पूर्ण कचरा कुजतो तेव्हा खड्डा थंड होतो. असा खड्डा थंड झाला की, आपले कंपोस्ट खत तयार झाले आहे असे समजावे. ते कोणत्याही पिकाला वापरता येते. या सार्‍या प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे डिकंपोझिंग कल्चर हे कुजण्याची प्रक्रिया गतीमान करण्यास उपयोगी पडत असते. हे कंपोस्ट खत तीन ते चार महिन्यात तयार होते आणि ते निर्जंतूक असते. अशा रितीने आपण तयार केलेले हे कंपोस्ट खत रासायनिक खताला उत्तम पर्याय आहे. आपल्या शेतीचे बिघडलेले आर्थिक गणित ताळ्यावर आणण्याची क्षमता या कंपोस्ट खतात आहे.

Leave a Comment