ऑस्ट्रीयात भरलाय बॉडी पेंटींग फेस्टीव्हल

bodypaint
ऑस्ट्रीया हा मुळातच अतिशय निसर्गसंपन्न देश. या देशातील पोर्सेक हे शहर तर सुंदर सरोवरांचे शहर म्हणूनच ओळखले जाते. या सरोवरांच्या शहरात यंदाचा बॉडी पेटींग फेस्टीव्हल साजरा होत असून हा महोत्सव २९ जूनपासून सुरू झाला आहे आणि तो ६ जुलैला संपतो आहे.

या आगळ्यावेगळ्या महोत्सवात माणसाच्या शरीरालाच कलाकार, चित्रकार कॅनव्हास मानतात आणि त्यावर अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत विविध मनोहारी, मजेशीर, आगळीवेगळी चित्रे रंगवून काढली जातात. या महोत्सवासाठी यंदा जगभराच्या विविध देशांतून ४६ कलाकार सहभागी झाले आहेत. गेली १७ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जात आहे आणि त्याला जगभरातून चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

अर्थात या महोत्सवात मॉडेल म्हणून युवतीच सहभागी होत असतात. आपली शरीरे विविध रंगानी रंगवून घेतल्यानंतर त्यात अधिक भर घालण्यासाठी विविध शिरोभूषणे, मुकुटही चढविले जातात. येथे केवळ हे प्रदर्शनच असते असे मात्र नाही. तर बॉडी पेंटींगची कला शिकविण्यासाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. तज्ञांची चर्चासत्रे होतात आणि त्याचबरोबर संगीत, फॅशन शो यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामुळे या महोत्सवाला भेट देणार्‍या प्रेक्षकांना भरभरून आनंद लुटता येतो.

Leave a Comment