अमेरिकेवर मात करुन डार्कहॉर्स उपांत्यपूर्व फेरीत

beljium
साल्वाडोर – बुधवारी मध्यरात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात विश्वचषक स्पर्धेतील डार्कहॉर्स मानल्या जाणा-या बेल्जियमने अमेरिकेला २-१ अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २८ वर्षानंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी बेल्जियमने गाठली आहे.

अर्जेटीना-स्वित्झर्लंड सामन्याप्रमाणे या लढतीस देखील निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता न आल्याने निकालही अतिरिक्त वेळेत लागला. बेल्जियमने हा विजय तीस मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतील खेळात डी ब्रुएन आणि बदली खेळाडू लुकाकूने केलेल्या दोन गोलच्या बळावर मिळवला. बेल्जियमला विजयासाठी अमेरिकेचा गोलरक्षक टीम हॉवर्डच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे संघर्ष करावा लागला. सामन्याच्या ९३ व्या मिनिटाला मध्यरक्षक लुकाकूकडून मिळालेल्या पासवर डी ब्रुएनने बेल्जियमसाठी पहिला गोल केला.

त्यानंतर डि ब्रुएनने दिलेल्या पासवर लुकाकूने १०५ व्या मिनिटाला दुसरा गोल करत, बेल्जियमची आघाडी २-० ने वाढवली. दुस-या गोल खाल्यानंतर अमेरिकेने आक्रमणाचा वेग अधिकच वाढवला. अखेर ज्युलियन ग्रीनने १०७ व्या मिनिटाला बेल्जियमची बचावफळी भेदत अमेरिकेसाठी पहिला गोल केला. त्यानंतर क्लिंन्ट डेम्पसीला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र बेल्जियमचा गोलरक्षक कोर्टटॉईसने तो गोल वाचवला. अन्यथा सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला असता. पुढच्या फेरीत बेल्जियमची गाठ अर्जेटींनाशी पडणार आहे. शनिवारी ब्राझिलियामध्ये ही लढत रंगणार आहे.

Leave a Comment