अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरण; तपासाचे निष्कर्ष मागवले

jiha
मुंबई – अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करणार्‍या जियाची आई रबिया खान यांच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. जियाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? तिच्या मृत्यूमागील सत्य उजेडात आलेच पाहिजे, असे मत व्यक्त करत न्यायालयाने पोलिसांकडे आतापर्यंतच्या तपासातील निष्कर्ष मागवले आहेत.

बॉलीवूडमध्ये ‘नि:शब्द गर्ल’ म्हणून ओळख निर्माण करणार्‍या जियाचा गेल्यावर्षी ३ जून रोजी जुहू येथील राहत्या घरी गूढ मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा दावा करत जियाची आई रबिया खान यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात रबिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती पी. डी. कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जियाने मद्यप्राशन केल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित करत खंडपीठाने तिने किती प्रमाणात मद्यप्राशन केले होते? याची माहिती मागवली. तसेच जियाच्या शरीरावर आढळून आलेल्या मारहाणीच्या खुणांबद्दलही खंडपीठाने विचारणा केली. जियाची हत्याच झाल्याच्या दाव्याला बळ देण्यासाठी याचिकाकर्त्या रबिया यांनी वैद्यकीय तसेच न्यायवैद्यक पुरावे सादर केले आहेत.याच सुनावणीदरम्यान खंडपीठाने जियाच्या मृत्यूमागील नेमके सत्य जाणून घेण्यासाठी सरकारी वकील पूर्णिमा कांथारिया यांना तपासाचे निष्कर्ष सादर करण्याचा आदेश दिला.या प्रकरणी ३ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Leave a Comment