अन्य एटीएममधून पैसे काढताना, दरवेळी मोजावे लागणार शुल्क!

atm
नवी दिल्ली – अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढणार्‍या ग्राहकांना आता दरवेळी शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय ‍रिझर्व्ह बॅंकेकडे इंडियन बँक असोसिएशनने प्रस्ताव पाठवला असून, शहरातील अन्य एटीएमवर पैसे काढल्यास २० रुपये शुल्क आकारावा असे प्रस्तावात म्हटले आहे. आरबीआय यावर सकारात्मक विचार करत असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, वाढता खर्च भरून काढण्यासाठी शहरातील स्वत:च्या बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क आकारण्यात यावे, अशी शिफारस रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली; परंतु ग्रामीण आणि निमशहरी भागाला मात्र या शुल्कात वगळावे, असे मत असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. टांकसाळे यांनी व्यक्त केले.

देशभरातील सुरक्षिततेच्या कारणास्तव बँकांच्या एटीएमच्या मोफत व्यवहारांची संख्या मोठ्या शहरांसाठी मर्यादित करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. मेट्रो शहरांमध्ये अथवा मोठ्या शहरांमध्ये ग्राहक राहत असेल तर दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी वेगळे शुल्क भरावे लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या देशात अन्य बँकांच्या एटीएममधून किमान पाच वेळा रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला वीस रुपये शुल्क आकारण्यात येते.

Leave a Comment