शारापोवाचे विम्बल्डनमध्ये आव्हान संपुष्टात

maria
लंडन- मंगळवारी चौथ्या फेरीत फ्रेंच ओपन विजेती पाचवी सीडेड रशियाच्या मारिया शारापोवाचे आव्हान संपुष्टात आले. शारापोवाला चुरशीच्या लढतीत ७-६(७/४), ४-६, ६-४ असे हरवत नववी सीडेड जर्मनीची अँजेलिक कर्बरने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुरुष एकेरीत अव्वल सीडेड सर्बियाचा नोवाक जोकोविचसह चौथा सीडेड स्वित्झर्लंडलडचा रॉजर फेडरर तसेच त्याचा देशबंधू स्टॅनिस्लास वावरिंकासह महिला एकेरीत सॅबिने लिसिकी, सिमोना हॅलेपने अंतिम आठ टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवले.

शारापोवाचे पारडे महिला एकेरीत कर्बरविरुद्ध जड वाटत होते. मात्र कर्बरने तिच्यावर आश्चर्यकारक मात केली. आव्हान सोपे नाही, हे शारापोवाला ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या पहिल्याच सेटमध्ये कळून चुकले. दुसरा सेट जिंकत तिने ‘कमबॅक’ केले तरी तिस-या आणि अंतिम सेटमध्ये मोक्याच्या क्षणी सव्‍‌र्हिस भेदत कर्बरने आगेकूच केली. अन्य लढतींमध्ये २३व्या सीडेड ल्युसी सॅफारोवाने २२व्या सीडेड रशियाच्या इकटेरिना मॅकॅरोवावर ६-३, ६-१ अशी मात केली.

तिस-या सीडेड रोमानियाच्या सिमोना हॅलेपने बिनसीडेड कझाकस्तानच्या दियासवर ६-३, ६-० असा विजय मिळवला. १९व्या सीडेड जर्मनीच्या सॅबिने लिसिकीने कझाकस्तानच्या श्वेडोवाचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. पुरुष एकेरीत माजी विजेता रॉजर फेडररने २३व्या सीडेड स्पेनचा टॉमी रॉब्रेडोला सरळ सेटमध्ये बाहेरचा रस्ता दाखवला. कारकीर्दीत १२व्यांदा त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत फेडररसमोर देशबंधू वावरिंकाचे आव्हान आहे.

पाचवा सीडेड वावरिंकाने १९व्या सीडेड स्पेनच्या फेलिसियानो लोपेझवर मात केली. अव्वल सीडेड जोकोविचनेही अव्वल आठ टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवले. त्याने फ्रान्सचा जो-विल्फ्रेड त्सोंगावर चुरशीच्या लढतीत ६-३, ६-४, ७-६(५) असा विजय मिळवला. जोकोविचने ग्रँडस्लॅममध्ये सलग २१व्या वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Leave a Comment