मुंबई – पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागात टॅंकर सुरू करण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
टंचाईग्रस्त भागात टॅंकर, अधिकार तहसिलदारांना!
राज्यातील जलाशयात १९ टक्के साठा असून १४६४ टँकर्सद्वारे १३५९ गावांना आणि ३३१७ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ३५ पैकी ३४ जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे १ जुलै २०१४ ते ३० जून २०१५ पर्यंतचे त्रैमासिक कृती आराखडे तयार करण्यात येणार आहेत. पहिला आराखडा ५ दिवसांत सादर करावा आणि पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठा अग्रहक्काने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावा,असा निर्णय घेण्यात आला . टंचाईवरील सर्व उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. राज्यात ३० जूनपर्यंत ५८.५० मिमी. म्हणजे सरासरीच्या २६.३० टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांत सरासरीच्या फक्त २५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे, यावरही बैठकीत चर्चा झाली.