२६/११ चा हल्ला ; आता पोलिसांकडे अमेरिका -जर्मनीची आधुनिक शस्त्रे

police
मुंबई : २६/११ च्या हल्ल्यादरम्यान आधुनिक शस्त्रांअभावी पाकिस्तानी दहशतवाद्दय़ांचा मुकाबला करताना मेटाकुटीस आलेले मुंबई पोलीस आता संभाव्य दहशतवादी कारवाया उलथवून लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने अमेरिका व जर्मनीतून आधुनिक शस्त्रे खरेदी करून ती पोलिसांच्या हाती दिल्याचे माहिती अधिकार कायद्यातून(आरटीआय) स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही शस्त्रे खरेदी केल्याचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. अशा प्रकारची शस्त्रे प्रामुख्याने नक्षलविरोधी दल आणि फोर्स वनचे जवान वापरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकाराचा वापर करून मुंबई पोलीस दलाकडील उपलब्ध शस्त्रांबद्दल माहिती मागवली होती. त्यांच्या अर्जावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून मुंबई पोलीस दलाची सज्जता उघडकीस आली आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांना अधिक सक्षम करण्यावर राज्य सरकारने भर दिला. त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांना रॉकेट लाँचर्स, अंडर बॅरेल ग्रेनेड लाँचर्स (यूबीजीएल), ऑटोमेटिक ग्रेनेड लाँचर्स (एजीएल), स्निपर रायफल्स, मोर्टार्स, प्रोजेक्टर ग्रेनेड्स, कॉर्नर शॉट विपन्स आणि कॉर्ड डिटोनेटिंग एक्स्प्लोसिव्ह्स आदी आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त पोलिसांकडे एसएलआर, एके-४७, मशीन गन्स व स्टेन गन्सही मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची देशी तसेच परदेशी बनावटीची विविध आधुनिक शस्त्रे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहे

Leave a Comment