राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद

doctors
मुंबई – राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.

डॉक्टरांच्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मंग्मो) शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला आहे. डॉक्टरांची ‘मग्मो’ संघटना गेली चार वर्षे मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे. शासनाच्या सेवेत समावेश न करण्यात आलेल्या सन २००९ आणि २०१० सालच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाभ द्यावेत, डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करून निवृत्ती वय ५८ वरून ६२ करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्ती मार्गी लावणे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना रखडलेल्या वेतनवाढीचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी २ जून रोजी मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी १० दिवसांत अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र याची अंबलबजावणी झालीच नाही, असा आरोप मग्मोचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केलाय. आझाद मैदानात धरणे आंदोलन तसेच राज्यभरातील जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.