भारतीय शास्त्रज्ञाचे अमेरिकेतील पर्वताला नाव

sinha
वॉशिंग्टन- भारतीय-अमेरिकन वंशाचे वैज्ञानिक अखौरी सिन्हा यांचे नाव अमेरिकेतील अंटार्क्टिका येथील एका पर्वताला दिले आहे. या पर्वताचे नाव सिन्हा यांच्या सन्मानार्थ माऊंट सिन्हा असे ठेवण्यात आले आहे.

सिन्हा यांनी मिनेसोटा विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स आणि सेल बायोलॉजी अँड डेव्हलपमेंट मध्ये प्राध्यापक असताना प्राण्यांच्या जैविक संशोधनात मोलाचे योगदान दिले. सिन्हा १९७२ आणि ७४ मध्ये अमुंडसेन आणि बेलिंगशॉसेन या सागरी भागात ग्लेशियर्स, व्हेल मासे आणि पक्षी यांची गणना करणा-या पथकात कार्यरत होते.

या अतुलनीय कार्याची दखल घेत अमेरिकेतील अंटार्क्टिका नाव सल्लागार समिती आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग यांनी अंटार्क्टिकातील एका पर्वताला सिन्हांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

समुद्र सपाटीपासून ९९० मीटर उंचीवर असलेले हे माऊंट सिन्हा पर्वत हे एरिक्सन ब्लफ्सच्या आग्नेय आणि मॅकडोनाल्ड हाईट्सच्या दक्षिण भागात आहे. कोणीही माऊंट सिन्हा पर्वत गुगल आणि बिंग या संकेतस्थळांवर पाहू शकतो.

सिन्हा यांनी या पर्वतीय भागात १९७२ आणि १९७४ मध्ये २२ आठवडे विविध जैविक संशोधनाचे कार्य केले. या संशोधनाची त्यांची १०० पत्रकेही प्रकाशित करण्यात आली. सुमारे २५ वर्षे त्यांनी प्राध्यापकपदी काम केले. अंटार्क्टिकाच्या या पर्वतावर त्यांच्या पथकाने प्राणी आणि जैविक संशोधनावर सुमारे चार महिने संशोधन केले.

कोणतीही पूर्वकल्पना नसताना, या परिसराची माहिती नसताना येथे त्यांना हेलिकॉप्टरने आणून सोडले होते. त्यावेळी संशोधन करत असताना पाल्मेर स्थानकाजवळ त्यांच्यावर स्कुआ नावाच्या पक्षांनी हल्ला केला. त्यातून ते थोडक्यात बचावले. त्यामुळे काम करण्याची धमक आपल्यात असायला हवी. तुम्ही कर्तुत्त्ववान आहात हे जगाला दाखवून द्या, घाबरु नका आणि प्रत्येक संधीचे सोने करा, असे अमेरिकेतील सन्मानानंतर बोलताना सिन्हा यांनी सांगितले.

Leave a Comment