बिनभांडवली उद्योग-२

udyog
मुळात ज्यांना नोकरीतच रस असतो आणि आपण मोठा उद्योगपती व्हावे अशी इच्छा-आकांक्षाच नसते अशा लोकांना बळजबरीने घोड्यावर बसवून स्वतंत्र उद्योग करायला भाग पाडता येत नाही. मात्र त्यांना तसे पटविण्याचा प्रयत्न सुरू केला की, त्यांचे बहाणे सुरू होतात. सगळ्यात मोठा बहाणा असतो भांडवलाचा. आपल्याकडे भांडवल नाही म्हणून आपण उद्योग सुरू करू शकत नाही असे सांगितले जाते. पण उद्योग, व्यापार सुरू करायला भांडवल ही खरोखरच मोठी अट असते का, याचा विचार करायला लागतो तेव्हा असे लक्षात येते की, भांडवल ही मुख्य अडचण नसते. याबाबत आपण माहेश्‍वरी समाजाकडे पाहू. आपल्याकडे माहेश्‍वरी समाजाला मारवाडी म्हणण्याची पद्धत आहे. मारवाडी ही काही जात नाही. जे लोक मारवाड प्रांतातून महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यात गेले त्यांना मारवाडी म्हटले जाते. मारवाडी समाज भारतभर विखुरलेला आहे आणि विविध प्रांतांमध्ये या समाजाने व्यापारच केलेला आहे. कोणत्याही प्रांतात मारवाडी माणूस नोकरीसाठी गेलेला नाही आणि या समाजातले लोक प्रामुख्याने व्यापार उदीमच करतात. अगदी अपवाद म्हणून काही लोक नोकर्‍या करत असतील, परंतु त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीत व्यापारच असतो. व्यापारासाठी हे लोक कोठेही जाऊ शकतात. भाषेच्या, प्रांताच्या अडचणी येत असूनही ते नवनव्या प्रांतात गेलेले आहेत, जात असतात आणि तिथे जाऊन व्यापारच करतात. हे एक प्रकारचे धाडसच आहे आणि ते मारवाडी समाजाने केलेले आहे.

मारवाडी समाजाचे लोक जिथे जातील तिथे व्यापारच करतात आणि तिथे ते श्रीमंत म्हणून ओळखले जातात. एका मारवाडी व्यापार्‍याने मला दिलेल्या माहितीनुसार देशातला पैशाचा फार मोठा भाग मारवाडी लोकांकडे आहे. अनेक शहरात त्यांनी पैसा कमावून तिथल्या लोकांना दानही दिलेला आहे आणि अनेक संस्था उभ्या केल्या आहेत. शिक्षणाची दारे गोरगरीबांना उघडी करणार्‍या शिक्षण संस्था काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये गेलोे असता असे लक्षात येते की, तिथे मारवाडी समाजातील दानशूर लोकांनी समाजाच्या विकासासाठी करोडो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. या समाजात पैसाही कमावला आहे आणि कमावलेल्या पैशाचा मोठा हिस्सा याच समाजाच्या उत्कर्षासाठी देणगीच्या रुपात समाजाला दिलेला आहे. प्रत्यक्षात माहेश्‍वरी समाजाची पूर्ण देशातली संख्या अवघी १५ लाख आहे. पण हेच १५ लाख अनेक कोटी लोकांचे पोशिंदे झाले आहेत.

या समाजाचे हा पैसा कमावला कोठून? जातील तिथे हे लोक श्रीमंतच कसे होतात? व्यापार-उदीम सुरू करून त्यांनी समाजात आपले हे स्थान निर्माण केले आहे, पण हा व्यापार सुरू करताना त्यांच्याकडे भांडवल कोठे होते? महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरातल्या श्रीमंत माहेश्‍वरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी आणि इतिहास यांचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, खिशामध्ये एक पैसाही नसताना हे लोक व्यापारात पडलेले आहेत आणि भांडवलाशिवायच उद्योग उभे करून त्यांनी समाजात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. साधारणत: प्रत्येक माहेश्‍वरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी थोड्या फार फरकाने सारखीच असते. मारवाड हा राजस्थानातला एक विभाग आहे आणि तो जगातला सर्वात कमी पाऊस पडणारा विभाग म्हणून ओळखला जातो. पाऊस कमीत कमी पडून सुद्धा शेती उत्तम कशी करावी हे या लोकांना परंपरेने माहीत होते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये काटकसरी वृत्ती जोपासली गेली आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी मारवाड प्रांतात सलग दुष्काळ पडायला लागले. जेमतेम पडणारा पाऊस सुद्धा लहरी झाला आणि या लोकांना पोटापाण्याच्या सोयीसाठी आपला मारवाड प्रांत सोडून अन्य प्रदेशात जावे लागले. हे लोक हातात एक लोटा घेऊन घराच्या बाहेर पडले. चालत चालत देशातल्या विविध शहरांमध्ये गेले. हातात पैसा नव्हता, भांडवल नव्हते. पण जिद्दीच्या जोरावर यातल्या प्रत्येक कुटुंबाने जाईल त्या प्रांतात शून्यातून विश्‍व निर्माण केले. आपल्या गोड बोलण्याच्या जोरावर त्यांनी हा पराक्रम केला.

आज संपर्काच्या सोयी वाढलेल्या आहेत. प्रवास सोपा झाला आहे. कोणत्याही प्रांतातला माणूस कोणत्याही प्रांतात जाऊ शकतो. परंतु दोनशे वर्षांपूर्वी संपर्काच्या सोयी नसताना, वाहनांची उपलब्धता नसताना या लोकांनी देशभरात फिरून आपले साम्राज्य निर्माण केले. ते ज्या नवनव्या प्रांतात गेले त्या प्रांतात त्यांचे कोणी नातेवाईक नव्हते. त्यांची भाषा बोलणारे कोणी नव्हते, परिचयाचे कोणी नव्हते. पण तरी सुद्धा मारवाड प्रांतातून बाहेर पडलेले हे लोक मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक अशा नवनव्या राज्यात तर गेलेच पण तमिळनाडू, केरळ याही राज्यात गेले. महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये मोडकी तोडकी हिंदी बोलली जाते, पण तमिळनाडूमध्ये आणि विशेषत: ईशान्य भारतातल्या आसाम, नागालँड अशा राज्यांमध्ये भाषेची प्रचंड मोठी अडचण पडते, पण असे असूनही हातात एक पैसाही नसताना त्याही राज्यात मारवाडी समाजाने व्यापार केलेला आहे आणि पैसाही कमावलेला आहे. उद्योग उभा करायचा म्हटले की, भांडवलाचा बहाणा सांगणार्‍या मराठी माणसाने माहेश्‍वरी समाजाचा आदर्श घेतला पाहिजे.

Leave a Comment