जर्मनीला नमविण्यासाठीचे अल्जेरियाचे प्रयत्न व्यर्थ

germany
पोर्टो अ‍ॅलीग्री – अल्जेरियावर २-१ अशी मात करत विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुस-या सामन्यात जर्मनीने मंगळवारी मध्यरात्री पोर्टो अ‍ॅलीग्री स्टेडियमवर रंगलेल्या बादफेरीच्या या सामन्यात अल्जेरियावर विजय मिळवला असला तरी, जर्मनी सारख्या बलाढय संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.

जर्मनीने निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात अल्जेरियन गोलपोस्टच्या दिशेने अनेक हल्ले केले. मात्र अल्जेरियाचा गोलरक्षक रायस एमबोल्ही आणि अल्जेरियन बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर सामना अतिरिक्त वेळेत गेल्यानंतर जर्मनीने दोन गोल केले. (९०+२) मिनिटाला अँड्रे शुर्लेने अल्जेरियाचा बचाव भेदत जर्मनीसाठी पहिला गोल नोंदवला.

ओझीलने त्यानंतर १२० व्या मिनिटाला जर्मनीसाठी दुसरा गोल डागत आघाडी २-० ने वाढवली. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना, अल्जेरियाच्या डीजाबाऊने जर्मनीच्या बचावफळीला चकवत सुरेख गोल केला. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. जर्मनीचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता.

जर्मनीने अल्जेरियावर जरी विजय मिळवला असला तरी, त्यांना अल्जेरियाने विजयासाठी अक्षरक्ष झुंजवले. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच अंतिम सोळा संघांमध्ये अल्जेरियाने प्रवेश केला होता. उपांत्यफेरी गाठण्यासाठी जर्मनीला फ्रान्सचा अडथळा पार करावा लागणार आहे. जर्मनीने याआधी १९८२ आणि १९८६ साली विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत फान्सला पराभूत केले आहे. या सामन्यात सुरेख गोलरक्षण करणा-या अल्जेरियाच्या रायस एमबोल्हीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Leave a Comment