‘कोयने’च्या पाण्याने गाठला तळ

koyna
सातारा – मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठय़ाने तळ गाठला आहे.राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धरणातील पाणीसाठा सिंचन व पिण्यासाठी वापरावा, या दिलेल्या आदेशाची कोयना प्रकल्पाने ३६ तासांनी अंमलबजावणी केल्याने धरणातील पाणीसाठय़ावर कार्यान्वित असलेल्या पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन टप्पे बंद करण्यात आले आहेत. कोयना धरणात केवळ ८.८५ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त राहिला आहे.

राज्यातील प्रमुख धरणांतील शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी वीज कंपनीने ३६ तासांनी करून १,४00 मेगावॅट वीजनिर्मितीचे दोन संच बंद केले आहेत. पश्‍चिमेकडून केवळ ६00 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. यासाठी पाणीकपात करण्यात येत आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचन व दुष्काळी तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यात येत आहे.कोयना धरणाची सध्याची जलपातळी २0३९.५ फूट असून धरणात १३.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. यातील ८.८५ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणाची जलपातळी २११0.३ फूट होती. धरणात सध्या एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Leave a Comment