आता ९० मिनिटांत पोहचा दिल्लीहून आगर्‍याला!

train
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारने देशात लवकरच बुलेट ट्रेन सुरू करण्याचा संकल्प सोडला असतानाच भारतीय रेल्वे येत्या गुरुवारी दिल्ली-आग्रा मार्गावर सेमी-हायस्पीड रेल्वेची चाचणी घेणार आहे.

आता दिल्लीहून आगर्‍याला अवघ्या ९० मिनिटांत पोहोचता येणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वेची ट्रायल गुरुवारी (3 जुलै) घेतली जाणार असल्याचे रेल्वेच्या सू‍त्रांनी सांगितले. ताशी १६० किलोमीटर धावणारी हायस्पीड रेल्वे नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नवी दिल्लीहून आगरा येथे रेल्वेने जाण्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो.

गुरुवारी सकाळी 10 वाजता नवी दिल्ली स्टेशनवर ५४००HPच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने अद्ययावत असलेली रेल्वेची ट्रायल केली जाईल. संरक्षण आयुक्त पी.के. वाजपेयी, दिल्ली तसेच आगर्‍याचे डीआरएमसह वरीष्ठ अधिकारीदेखील या रेल्वेत उपस्थित राहतील.
ह्या हायस्पीड रेल्वेला दहा डबे असतील. नवी दिल्लीहून ती आगरासाठी रवाना होणार असून त्याच दिवशी परतीचा प्रवास करेल, अशी माहिती ‍दिल्लीचे डीआरएम अनुराग सचान यांनी दिली.

प्रोजेक्टशी संबंध‍ित एका अधिकार्‍याने सांगितले की, हायस्पीड रेल्वेसाठी रुळ तयार करण्‍यासाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ताशी 150 किलोमीटर वेगाने धावते.

Leave a Comment